लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे
परभणी : सेलू येथील शेरे परिवाराचे कुलदैवत आणि शहराचे श्रद्धास्थान असलेल्या शेरे गल्लीतील जगदंबा देवी नवरात्र महोत्सवाला आज, दि. ११ ऑक्टोबरपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे.
रविवारी सकाळी १० वाजता शिवाजी विठ्ठलराव शेरे यांच्या हस्ते घटस्थापना व जगदंबेची विधिवत पूजा होणार आहे. केशव लक्ष्मणराव दीक्षित पौरोहित्य करणार आहेत.
नऊ दिवस दररोज सकाळ-संध्याकाळ महाआरती, सायं. ७ ते ८ हरिपाठ, रात्री भजन, भारुड आणि हनुमान चालीसा पठण होणार आहे.
दि. १२ ते १८ ऑक्टोबर दरम्यान दुपारी १२ ते ४ या वेळेत भागवताचार्य नंदकुमार महाराज गोंदीकर यांच्या रसाळ वाणीतून देवी भागवत कथेचे निरूपण होईल. या कथेचे यजमान कैलास बाबाराव शेरे आहेत.
दि. १८ रोजी कथेची सांगता, १९ रोजी अष्टमी होम होईल. दि. २५ ऑक्टोबर (पौर्णिमा) रोजी सकाळी ११ ते १ कीर्तनकेसरी ह.भ.प. जयराम महाराज तांबडे यांचे काल्याचे कीर्तन व दुपारी १ ते ४ महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन केले आहे.
भव्य छबिना मिरवणूक
सायंकाळी ७ वाजता जगदंबा मातेची भव्य पालखी (छबिना) मिरवणूक निघेल. पारंपरिक वेशातील महिला-पुरुष भक्त, गळ्यात कवड्यांच्या माळा, हातात पोत घेतलेले भक्त या मिरवणुकीचे आकर्षण असणार आहे. बँड, फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक प्रमुख मार्गावरून मंदिरात परतेल. ठिकठिकाणी महिला पालखीचे औक्षण करतील.
५०० वर्षांपूर्वीचा इतिहास
जाणकारांच्या मते, सुमारे ५०० वर्षांपूर्वी शिर्डीचे संत साईबाबांचे सद्गुरु आणि सेलूचे ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब यांच्या वास्तव्य असलेल्या सुमेधन गल्लीतील मातीच्या गढीत ही मूर्ती सापडली होती. शेरे परिवाराने वाजत-गाजत आणून तिची एका कोनाड्यात स्थापना केली. आज भाविकांच्या सहकार्यातून तिथे भव्य मंदिर उभे आहे.
तेव्हापासून शेरे परिवार हा उत्सव दिवाळीप्रमाणे साजरा करतो. या काळात माहेरवाशीण लेकी-बाळी आवर्जून येतात. तरुण पिढीच्या सहभागामुळे गल्लीपुरता असलेला हा उत्सव आता संपूर्ण सेलूवासीयांचा झाला असून नऊ दिवस मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप येते.
No Comment! Be the first one.