जवाहरनगर पोलिसांची कारवाई; CCTV फुटेजच्या आधारे गुन्ह्याची उकल
विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : रोपळेकर चौकात पानटपरी चालकाच्या हातातील बॅग हेल्मेट घालून नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने बळजबरीने हिसकावून नेली. या प्रकरणाचा जवाहरनगर पोलिसांनी CCTV फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या १२ तासांत छडा लावत आरोपीला अटक केली.
१० सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता जितेंद्र रणछोडदास वैष्णव हे सागर पानटपरी सुरू करण्याच्या तयारीत असताना आरोपीने त्यांच्या हातातील काळ्या रंगाची बॅग हिसकावून दुचाकीवरून पळ काढला. बॅगेत सिगारेट, बिडी, माचिस, ७ हजार ८०० रुपये रोख, तसेच पेटीएम व भारतपेचे स्पीकर व स्कॅनर असा एकूण ४० हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल होता.
पोलिस अंमलदार मारोती गोरे व राजेंद्र शिंदे यांनी CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. गुप्त माहिती व सायबर सेलच्या तांत्रिक मदतीने आरोपी सातारा परिसरातील नाईक नगर येथे असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी मनिष दिलीप गोरवाडकर (वय ४३, रा. देवगिरी कॉलनी, सातारा-बीड बायपास) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने बॅग लुटल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास सुरू आहे.

No Comment! Be the first one.