लाचखोर पोलिस अंमलदाराविरोधात गुन्हा; आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी
विजय देऊळगावकर
गंगापूर : शहरातील उपनगराध्यक्ष अमोल जगताप यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी लाचखोरीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या पोलिस अंमलदार शकील सत्तार शेख याच्याविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
जगताप यांच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ते त्यांचे मित्र राहुल वानखेडे यांच्यासोबत शहरातील एका चहाच्या हॉटेलवर थांबले होते. त्यावेळी त्यांना त्यांचे मित्र गायकवाड हे गंगापूर पोलिस ठाण्यात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे जगताप व वानखेडे पोलिस ठाण्यात गेले. त्यावेळी पोलिस ठाण्याच्या आवारात लाचखोरी करताना पकडण्यात आलेला पोलिस अंमलदार शकील शेख हा साथीदारांसह जगताप यांच्याकडे आला.
यावेळी शेख याने जगताप यांना शिवीगाळ करत, “माझे काहीही बिघडत नाही. मी परत आल्यावर तुम्हाला बघून घेईन आणि संपवून टाकीन,” अशा शब्दांत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकारानंतर जगताप यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून शकील शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, लाचखोरीच्या प्रकरणात शकील शेख याला अटक करण्यात आली असून, शुक्रवारी त्याला गंगापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

शकील सत्तार शेख
No Comment! Be the first one.