गायक, कवी, शाहीर व प्रबोधनकार एकाच मंचावर; गीतांतून सरकारच्या धोरणावर टीका
विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध दर्शवत महाराष्ट्रातील आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीतील गायक, कवी, शाहीर, जलसाकार व प्रबोधनकार एकवटले. निराला बाजार येथील तापडिया नाट्यमंदिरात ‘आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचे शिलेदार’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कलावंतांनी गीत, शाहिरी व प्रबोधनाच्या माध्यमातून सामाजिक समता, संविधानिक मूल्ये आणि आरक्षणाच्या प्रश्नावर भाष्य केले. उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधातील भूमिका सांस्कृतिक माध्यमातून मांडण्यात आली.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध भागांतील सुनील खरे, सीमाताई पाटील, विद्या बनसोडे, उर्मिला भिसे, संघपाल गवई, विशाल चव्हाण, सपना खरात, शिवकुमार माने यांच्यासह अनेक कलावंत सहभागी झाले. स्थानिक कलावंतांनीही गीत व प्रबोधनातून आपली भूमिका मांडली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल इंगळे यांनी केले. महाराष्ट्रातील विविध भागांतील प्रबोधनकार व कलावंतांना एकत्र आणण्यामागील भूमिका विजय वाहुळ यांनी स्पष्ट केली. यावेळी आंबेडकरी चळवळीसमोरील सामाजिक व राजकीय आव्हानांवरही भाष्य करण्यात आले. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते, साहित्यिक व नागरिकांची उपस्थिती होती.

No Comment! Be the first one.