मारोती मूर्तीचे सोन्याचे दोन व चांदीचे दोन डोळे हस्तगत; क्रांतीचौक पोलिसांची कारवाई
विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : शहरातील विविध मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीला क्रांतीचौक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून मारोती मंदिरातील मूर्तीचे सोन्याचे दोन डोळे, तसेच लहान मारोती मूर्तीचे चांदीचे दोन डोळे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
समर्थनगर परिसरातील मारोती मंदिरातील दानपेटी ११ सप्टेंबर रोजी पहाटे ३ ते ४ वाजेदरम्यान फोडण्यात आली होती. चोरट्याने दानपेटीतील रोकड तसेच मंदिरातील मारोती मूर्तीचे सोन्याचे दोन डोळे आणि शेंदूर लावलेल्या लहान मारोती मूर्तीचे चांदीचे दोन डोळे चोरी केले होते. याप्रकरणी पुजारी उदय विजयकुमार कुलकर्णी यांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना संबंधित आरोपी रेल्वेस्थानक परिसरात मिळून आला. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. चौकशीत त्याने शहरातील विविध मंदिरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वीही त्याने राम मंदिरातील दानपेटी फोडून चोरी केल्याचे समोर आले आहे. आरोपीला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त पंकज अतुलकर आणि सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी तावरे, पोलिस उपनिरीक्षक नेहा म्हस्के इरफ़ान खान , संतोष मुदिराज व पथकाने केली.



No Comment! Be the first one.