पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर जरांगे यांनी प्लॅन बदलला
मुंबईतील मराठा आंदोलनासाठी आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी रणनीतीमध्ये बदल केला आहे. जरांगे यांनी आता संपूर्ण मराठा आंदोलकांची फौज सोबत घेऊन न जाता एकट्यानेच मुंबईला जाण्याची घोषणा केली आहे. आम्ही चार-पाच लोक आंदोलनासाठी आलो तर पोलिस परवानगी कशी नाकारू शकतील, असा सवाल त्यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना केला.
गणेशोत्सवाच्या काळात लाखो मराठा आंदोलक मुंबईत आल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मी एकटाच मुंबईला येतो, अशी घोषणा करुन टाकली आहे. त्यानुसार मनोज जरांगे त्यांच्या चार ते पाच सहकाऱ्यांसह मंगळवारी मुंबईला रवाना होतील. आता पोलीस आणि देवेंद्र फडणवीस मला मुंबईत येण्यापासून रोखू शकत नाहीत. आता मला कोणी अडवले तर लाखो मराठे कोणत्याही परवानगीशिवाय मुंबईत घुसतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे आता आपल्याला रणनीतीमध्ये बदल करावे लागतील. फडणवीसांच्या तोडीस तोड डाव टाकायचा आपण. मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली ना, मग 15 तारखेला मी एकटा मुंबईला निघतो. आता मला एकट्याला देवेंद्र फडणवीस परवानगी देणार की नाही? मराठे मुंबईत गेल्यावर अडचणी निर्माण होणार, मग मी एकटा गेल्यावर परवानगी देणार नाही का?, असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला.
शेवटची भेट
मराठा समाजातील गोरगरिबांच्या लेकरा-बाळांच्या आरक्षणासाठी मी प्रामाणिकपणे लढतो आहे. पैसा किंवा पद मला फितवू शकत नाही, हे माझ्या समाजाला ठाऊक आहे. मी मुंबईला जाताना मला निरोप देण्यासाठी समाजबांधवांनी त्या-त्या ठिकाणी यावे. माझे उपोषण सुरूच राहणार असून, ही कदाचित आपली शेवटची भेट असेल, असे जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे यांच्या मुंबई दौऱ्याचा कार्यक्रम असा :
१५ सप्टेंबर : पहिला मुक्काम पाटोदा जि. बीड
१६ सप्टेंबर : दुसरा मुक्काम श्रीगोंदा जि. अहिल्यानगर
१७ सप्टेंबर : तिसरा मुक्काम हडपसर, पुणे
१८ सप्टेंबर : चौथा मुक्काम खोपोली जि. रायगड
१९ सप्टेंबर : मुंबईतील आझाद मैदानावर दाखल

No Comment! Be the first one.