
राजस्थान स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपची सरशी; मोदींसह केंद्रीय नेत्यांकडून कार्यकर्त्यांचे अभिनंदन
राजस्थानमधील पंचायत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून भारतीय जनता पक्षाने उल्लेखनीय यश मिळवले आहे. या विजयाबद्दल आनंद व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. जनतेचा हा कौल म्हणजे असत्याच्या आव्हानावर सत्याने मिळवलेला विजय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
राजस्थानच्या जनतेने डबल इंजिन सरकारच्या सुशासन आणि विकासाच्या धोरणांवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
मोदी, शाह, राजनाथ सिंह आणि नितीन नबीन यांच्या प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, आपल्या परिवारातील सदस्यांनी दिलेल्या या जनादेशातून जनतेचा सुशासन आणि विकासाच्या धोरणांवरील दृढ विश्वास पुन्हा अधोरेखित झाला आहे. राजस्थानला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेणे आणि सामान्य नागरिकांचे जीवन अधिक समृद्ध करणे, या सरकारच्या संकल्पाला या निकालामुळे अधिक बळ मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजस्थानी भाषेत पोस्ट करत या विजयाबद्दल मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, भाजप प्रदेशाध्यक्ष मदन राठोड आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. काँग्रेसच्या कुशासन आणि भ्रष्टाचारातून राज्याला बाहेर काढून भाजप सरकार राजस्थानच्या विकासाला गती देत असल्याचे त्यांनी म्हटले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही या निकालांवर प्रतिक्रिया देताना विकास आणि सुशासनाचे दुसरे नाव म्हणजे भारतीय जनता पक्ष असल्याचे म्हटले. विकसित राजस्थानच्या उद्दिष्टाच्या दिशेने राज्याची वाटचाल पुढेही सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी राजस्थानच्या जनतेने भ्रम पसरवणाऱ्या आणि नाराजीचे वातावरण निर्माण करणाऱ्या घटकांना बाजूला ठेवून कल्याणकारी योजना, विकास आणि सुशासनाला स्पष्ट पाठिंबा दिल्याचे म्हटले.
प्रमुख महापालिका आणि शहरांतील निकालांचे चित्र
राज्यात जाहीर झालेल्या एकूण 10,210 प्रभागांच्या निकालांमध्ये भाजपने 4,171 जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेसच्या खात्यात 3,597 जागा गेल्या.
उदयपूरमध्ये एकूण 80 जागांपैकी भाजपने 53 जागांवर विजय मिळवत स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले.
भीलवाड्यात 70 पैकी 45 जागांवर भाजपने आघाडी अथवा विजय मिळवला.
कोटामध्ये 100 पैकी 53 जागा जिंकत भाजपने आपली ताकद दाखवून दिली.
जोधपूरमध्ये मात्र भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 44 जागांवर विजय मिळवला, तर 10 जागा अपक्ष उमेदवारांच्या वाट्याला गेल्या.
बीकानेर, अजमेर आणि पाली या शहरांमध्ये काँग्रेसने भाजपपेक्षा चांगली कामगिरी केली. तर जयपूर आणि अलवरमध्ये भाजपने आघाडी घेतली.
मुख्यमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात अपक्षांची प्रभावी कामगिरी
या निवडणुकीत मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि भाजप प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांच्या गृहजिल्ह्यांमध्ये अपक्ष उमेदवारांनी लक्षवेधी कामगिरी करत मोठी बाजी मारली.
भरतपूरमध्ये, जो मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा गृहजिल्हा आहे, 65 पैकी तब्बल 36 जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय किंवा आघाडी मिळवली. येथे भाजपला 20, तर काँग्रेसला 7 जागा मिळाल्या.
पालीमध्ये, जे भाजप प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांचे गृहशहर आहे, 65 जागांपैकी काँग्रेसने 29 जागा जिंकल्या. भाजपला 21 जागा मिळाल्या, तर 15 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले.
अजमेरमध्ये एकूण 80 जागांपैकी काँग्रेसने 37 जागांवर विजय मिळवला. भाजपने 32 जागा जिंकल्या, तर 11 जागा अपक्षांच्या खात्यात गेल्या.
विशेष म्हणजे, संपूर्ण राजस्थानमध्ये तब्बल 2,272 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाल्याने अनेक नगर निकायांमध्ये सत्ता स्थापनेसाठी अपक्ष नगरसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
No Comment! Be the first one.