पवई येथील नामांकित ‘भारतीय तंत्रज्ञान संस्था’ आयआयटीमधील एका १९ वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या हॉस्टेलमधील खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. हा विद्यार्थी ‘ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी’ (Energy Science and Engineering) विभागातील द्वितीय वर्षात शिकत होता. याच वर्षी त्याने आयआयटीत प्रवेश घेतला होता. परीक्षा दालनात मोबाईल फोन वापरताना पकडले गेल्यानंतर काही तासांतच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. साहिल वाकोडे असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो यवतमाळ येथील रहिवासी आहे. त्याची आई शिक्षिका, तर वडील स्टेट बँकेत आहेत. या घटनेमुळे संतप्त झालेले विद्यार्थी रस्त्यावर उतरले.
मध्यसत्राच्या परीक्षेदरम्यान हा विद्यार्थी परीक्षेत मोबाईल फोनचा वापर करत असल्याचे आढळले. संस्थेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, त्याने परीक्षेतील प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिका ‘चॅटजीपीटी’ ChatGPT या AI टूलवर अपलोड करून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर प्राध्यापक आणि विभागप्रमुखांनी विद्यार्थ्याशी संवाद साधला. त्याच्याविरुद्ध कोणतीही शिस्तभंगाची कारवाई न करता, या घटनेमुळे त्याच्या शैक्षणिक कारकीर्दीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, अशी ग्वाही देत त्याचे समुपदेशन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांची निदर्शने
ही घटना घडल्यानंतर तो विद्यार्थी आपल्या हॉस्टेल क्रमांक ४ मधील खोलीत परतला. परंतु, सायंकाळच्या सुमारास तो खोलीत मृत अवस्थेत आढळून आला. पवई पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली. सुमारे ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी संस्थेच्या मुख्य इमारतीबाहेर एकत्र येत प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने केली. अशा गंभीर घटनेनंतरही संस्था आपले नियमित कामकाज व परीक्षा थांबवत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
परीक्षा तूर्तास स्थगित
परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून रात्री १०:३० च्या सुमारास आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांची समजूत काढली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत चालू असलेल्या सर्व मध्यसत्राच्या परीक्षा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय प्रशासनाने जाहीर केला.