विजय देऊळगावकर
वैजापूर : शहरातील लाडगाव रोडवरील आर. आर. बारच्या पहिल्या मजल्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ९ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक विनय सोनवणे यांच्या पथकाने १५ सप्टेंबर रोजी पहाटे साडेबाराच्या सुमारास केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौफुली परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. बांधकाम सुरू असलेल्या खोलीत काही जण ‘झन्ना-मन्ना’ नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकताच जुगाऱ्यांनी पळण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी सर्व ९ जणांना जागीच पकडले.
ताब्यात घेतलेल्यांमध्ये विनोद बाळू जाधव (३२), रवी ऊर्फ बंटी सुभाष बागूल (३९), दीपक भाऊसाहेब मुळे (३९), राजू रामदास गायकरवाड (३३), योगेश रमेश महंकाळे (३२), कमलेश रामसिंग राजपूत (३२), योगेश केशव धंगाळे (३४), अमोल विजय जाधव (२८) आणि अविनाश बब्रीनाथ गायकरवाड (२०) यांचा समावेश आहे.
कारवाईत जुगाराचे साहित्य, महागडे स्मार्टफोन, रोकड आणि एक प्लॅटिना मोटारसायकल असा एकूण १ लाख ६१ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील कारवाई सुरू आहे.

No Comment! Be the first one.