२०२७च्या ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा आणि भारतीय सिनेमासाठी महत्त्वाचा क्षण! संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ या मराठी थ्रिलर चित्रपटाची ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी म्हणजेच ऑस्कर २०२७साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने १८ सप्टेंबर रोजी ही घोषणा केली.
महाराष्ट्राच्या ग्रामीण पार्श्वभूमीवर आणि पारंपरिक ‘गोंधळ’ या लोकपरंपरेभोवती गुंफलेली कथा, मानवी नातेसंबंध, परंपरा आणि व्यक्तीच्या आकांक्षांमधील संघर्ष उलगडणाऱ्या या चित्रपटाची निवड तब्बल ३३ चित्रपटांमधून करण्यात आली आहे.
‘गोंधळ’ची निवड Best International Feature Film या विभागासाठी झाली आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन संतोष डावखर यांनी केले असून, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, किशोर कदम, सुरेश विश्वकर्मा यांच्यासह अनेक कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.
विशेष म्हणजे, संतोष डावखर यांच्या दिग्दर्शनाला यापूर्वी ५६व्या International Film Festival of India (IFFI) मध्ये ‘Silver Peacock’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
मराठी चित्रपटासाठी ही निवड केवळ एका सिनेमाची ऑस्करवारी नाही, तर महाराष्ट्राच्या मातीतली कथा, लोकपरंपरा आणि मराठी भाषेतील सर्जनशीलता आता जागतिक व्यासपीठावर पोहोचत असल्याचा महत्त्वाचा टप्पा आहे.
‘गोंधळ’ची ही ऑस्करवारी मराठी रसिकांसाठी नक्कीच अभिमानाचा क्षण आहे. आता जगाच्या रंगमंचावर मराठी सिनेमाचा आवाज किती दूरवर पोहोचतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे
No Comment! Be the first one.