व्होट चोरीच्या मुद्द्यावरून निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची आणि शेतकऱ्यांसाठी सरसकट मदत देण्याची मागणी
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वाईजळे नांदेड
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर खरमरीत टीका केली.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर ‘व्होट चोरी’ आणि ‘इलेक्शन चोरी’चे गंभीर आरोप करत आदित्य ठाकरे म्हणाले की, “या घोटाळ्याचे पुरावे आता समोर आले असून, त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. याविरोधात २ तारखेला मोठा मोर्चा काढण्यात येणार असून यामध्ये मनसे, काँग्रेससह इतर सर्व विरोधी पक्ष आणि नागरिक एकत्र येतील.”
दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना ठाकरे म्हणाले, “राज्यात दुष्काळाची परिस्थिती अतिशय बिकट आहे. सरकारने केवळ कागदावर दुष्काळ जाहीर न करता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी शेताच्या बांधापर्यंत केली पाहिजे.” तसेच, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची केवळ परीक्षा फीच नव्हे, तर संपूर्ण वर्षाची शैक्षणिक फी माफ करण्याची मागणी त्यांनी केली.
मुखेडेसह वगळलेल्या इतर तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत करण्याची मागणी करत ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केला, “सरकार जनतेला नक्की किती आणि कधी मदत करणार, याचा ‘क्वांटिफायबल’ (स्पष्ट) आकडा आजच्या आज जाहीर करावा.” कर्जमाफी आणि केवायसीच्या नावाखाली शेतकऱ्यांना केवळ आश्वासनं दिली जात असून प्रत्यक्षात मदत मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
नांदेड जिल्ह्यातील दुष्काळ पाहणीसाठी शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे हे कंधार तालुक्यातील गावांना भेटी देऊन पाहणी करताना ते माध्यमांशी संवाद साधला.
No Comment! Be the first one.