उभा ऊस वाळण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल; मिळेल तिथे ऊस पाठविण्याची लगबग
लोकार्थ प्रतिनिधी अविनाश घोगरे पाटील घनसावंगी
पावसाने पाठ फिरविली, विहिरी-बोअरवेल आटल्या आणि शेतातील पिके पाण्याअभावी करपू लागली… खरीप पिकांनंतर शेतकऱ्यांचा आर्थिक आधार असलेला ऊसही आता दुष्काळाच्या कचाट्यात सापडला आहे. उभा ऊस डोळ्यादेखत वाळण्यापेक्षा मिळेल ते उत्पन्न पदरात पाडून घेण्याची धडपड सुरू झाल्याने घनसावंगी तालुक्यात स्थानिक साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऊसतोडणीला वेग आला आहे. बाहेरील जिल्ह्यांतील गुऱ्हाळे, गूळनिर्मिती युनिट्स तसेच सुरू असलेल्या कारखान्यांकडे ऊस पाठविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.
यंदा पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने उसाच्या वाढीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी उसाची वाढ खुंटली असून पाण्याअभावी पाने सुकू लागली आहेत. काही शेतांमध्ये तर उभा ऊस वाळण्याच्या मार्गावर पोहोचला आहे. विहिरी, बोअरवेल आणि इतर सिंचनस्रोतांमधील पाणीसाठा झपाट्याने खालावल्याने उसाला नियमित पाणी देणे शेतकऱ्यांना अशक्यप्राय झाले आहे. टँकर किंवा अन्य माध्यमातून पाणी देऊन पीक वाचविण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी त्यासाठी होणारा अतिरिक्त खर्च परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी अखेर ऊस काढण्याचा निर्णय घेतला आहे.
सामान्य परिस्थितीत ऊस पूर्ण वाढीस आल्यानंतर आणि अपेक्षित वजन मिळाल्यावर त्याची तोडणी केली जाते. मात्र, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीने हे गणितच बदलले आहे. आणखी काही दिवस ऊस शेतात ठेवला तर तो पाण्याअभावी वाळून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे कमी वयातच ऊसतोडणी करून मिळेल ते उत्पन्न वाचविण्याची वेळ आली आहे. परिणामी उसाचे अपेक्षित वजन मिळत नसून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर साखर उताऱ्यावरही परिणाम होण्याची चिंता ऊस उत्पादकांमधून व्यक्त होत आहे.
खरीप पिकांनी यंदा मोठा आर्थिक फटका दिल्यानंतर ऊस आर्थिक आधार देईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, पाण्याअभावी उसाचीही अवस्था बिकट झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पुन्हा कोलमडण्याची चिन्हे आहेत. स्थानिक कारखाने सुरू होण्यापूर्वीच ऊस बाहेरील भागातील गुऱ्हाळे व कारखान्यांकडे रवाना होऊ लागल्याने तालुक्यातील ऊस उत्पादकांसमोरील संकटाची तीव्रता अधोरेखित होत आहे. दुष्काळाचा फटका केवळ खरीप पिकांपुरता मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या नगदी पिकालाही बसला असून, ‘ऊस जगवायचा की काढायचा?’ या कात्रीत शेतकरी सापडला आहे.
No Comment! Be the first one.