अज्ञात चोरट्यांचा प्राणघातक शस्त्राचा धाक; दहा ग्रॅम सोन्याची पोत आणि कानातील फुले लंपास
लोकार्थ प्रतिनिधी : चंद्रकांत अंबिलवादे, पैठण
पैठण तालुक्यातील आपेगाव येथील एका शेतकरी महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी प्राणघातक शस्त्राचा धाक दाखवून लुटले. यावेळी महिलेने प्रतिकार केल्यानंतर एका चोरट्याने तिच्या डोळ्याखाली चावा घेत तिला जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. २६) घडली. घटनेची माहिती मिळताच पैठण पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून चोरट्यांचा शोध सुरू केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, आपेगाव येथील ताराबाई दिनकर ठेंनगे (वय ५०) या शनिवारी आगापूर शिवारातील गट क्रमांक १० मधील आपल्या शेतात सरकीला पाणी देत होत्या. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याशी बोलत विचारपूस करण्यास सुरुवात केली.
काही वेळातच या चोरट्यांनी प्राणघातक शस्त्राचा धाक दाखवत ताराबाई यांच्या अंगावरील दहा ग्रॅम सोन्याची पोत आणि कानातील फुले हिसकावण्यास सुरुवात केली. महिलेने त्याला विरोध केला असता एका चोरट्याने त्यांच्या डोळ्याखाली चावा घेतला. त्यानंतर दागिने घेऊन तिन्ही चोरटे तेथून पसार झाले.
घडलेल्या प्रकाराची माहिती ताराबाई यांनी कुटुंबीयांसह पैठण पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, बीट जमादार राजेंद्र जीवडे, शुभम पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. परिसरात नाकाबंदी करून चोरट्यांचा शोध घेण्यात आला.
जखमी ताराबाई ठेंनगे यांच्यावर रविवारी पैठण येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, दुष्काळी परिस्थितीत शेतवस्तीवर काम करणाऱ्या शेतकरी महिलांना चोरट्यांकडून लक्ष्य करण्यात आल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जखमी शेतकरी महिला ताराबाई दिनकर ठेंनगे रा. आपेगाव तालुका पैठण.
घटनास्थळाचा व्हिडिओ पोलीस पथक तपास करताना -पैठण
No Comment! Be the first one.