लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे जालना
जालना तालुक्यातील घाणेवाडी शिवारात सुरू असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पातील सुमारे ६० लाख रुपये किमतीची केबल चोरी केल्याप्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या केबलसह गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण २ लाख ६३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील आणखी दोघे आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.
घाणेवाडी जलाशयाजवळ सौरऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू असून, प्रकल्पासाठी आवश्यक असलेली मशिनरी व केबल जोडण्याचे काम सुरू होते. दरम्यान, चोरट्यांनी प्रकल्पातील सुमारे ६० लाख रुपये किमतीची केबल चोरून नेली होती. याप्रकरणी सौरऊर्जा प्रकल्पाच्या सुपरवायझरने दिलेल्या तक्रारीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चंदनझिरा पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून रोहित भासाहेब उकले (वय २६, रा. घाणेवाडी), साहिलखान जब्बारखान (वय १९, रा. संजयनगर, जालना) आणि शेख नजीम शेख ख्वाजा (वय ४१, रा. दुखी नगर, जालना) या तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून ३८ हजार ४०० रुपये किमतीची ३२ किलो केबल आणि चोरीसाठी वापरलेले वाहन असा एकूण २ लाख ६३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यातील शिवाजी दादू पवार आणि लक्ष्मण जाधव हे दोघे आरोपी फरार असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीरसिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे व त्यांच्या पथकाने केली.
No Comment! Be the first one.