लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर छत्रपती संभाजीनगर
तृतीयपंथीयांमधील दोन गटांच्या वादातून एका तृतीयपंथीयावर पाच जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना नारळीबाग परिसरातील शेतकरी भवनाजवळ सोमवारी (२८ सप्टेंबर) पहाटे ३ वाजता घडली. या हल्ल्यात सुवर्णा सुनिल पोटपिल्लेवार (२८) जखमी झाल्या आहेत. त्यांच्या फिर्यादीवरून सिटीचौक पोलिस ठाण्यात रंजिता नायक उर्फ सलीम शेख, कोमल आणि पाच अनोळखी जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुवर्णा पोटपिल्लेवार या चालक निखिलसोबत कारने (एमएच-२० एफवाय-९९१६) घरी जात असताना शेतकरी भवनाजवळ पाच जणांनी त्यांची कार अडवली. सुवर्णा कारमधून खाली उतरताच आरोपींपैकी एकाने, ‘तू रंजिता नायक उर्फ सलीम शेख व कोमल यांच्या सांगण्याप्रमाणे का चालत आहेस,’ असे म्हणत वाद घातला.
यानंतर एकाने डोक्यात बुक्का मारला, तर दुसऱ्याने फाईटने मारहाण केली. सुवर्णा खाली पडल्यानंतर आरोपींनी पाठीवर, खांद्यावर व गळ्याजवळ मारहाण केली. तसेच चाकूने पोटावर व हातावर वार केल्याचा, तर एका आरोपीने संवेदनशील ठिकाणी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या हल्ल्यात त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी सिटीचौक पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१)सह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून सपोनि शिंदे तपास करीत आहेत.
No Comment! Be the first one.