“दिवसभर राबलो तर संध्याकाळी पोट भरते, आता खायचे काय?” टपरीधारकांचा सवाल; पर्यायी जागा देण्याची मागणी“
लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे जालना
जालना शहरातील रेल्वे स्थानक चौकात महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवत टपऱ्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे हातावर पोट असलेल्या टपरीधारकांचा रोजगार हिरावला गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या कारवाईविरोधात टपरीधारकांनी महानगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे.
“आम्ही दिवसभर कष्ट करून दहा-वीस रुपये कमावतो. दिवसभर काम केले तर संध्याकाळी आम्हाला खायला मिळते. मात्र, महानगरपालिकेने आमच्या टपऱ्या हटवल्याने आता आम्ही खायचे काय?” असा संतप्त सवाल टपरीधारकांनी उपस्थित केला आहे.
रेल्वे स्थानक चौकात टपऱ्या लावून छोटा व्यवसाय करणाऱ्या अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. चहा, नाश्ता आणि इतर लहानसहान वस्तूंची विक्री करून हे व्यावसायिक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, महानगरपालिकेच्या कारवाईमुळे त्यांचा रोजगार बंद झाला असून, कुटुंबाचा खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
“आम्हाला रेल्वे स्थानक चौकात पुन्हा टपऱ्या लावून व्यवसाय करू द्या. चौकातील रस्ता मोठा आहे. आम्ही वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची काळजी घेऊ. आम्हाला रोजगारापासून वंचित ठेवू नका,” अशी भावनिक मागणी टपरीधारकांनी केली आहे.
महानगरपालिकेने अतिक्रमण हटवताना वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासोबतच गरीब आणि हातावर पोट असलेल्या टपरीधारकांच्या रोजगाराचाही विचार करणे आवश्यक आहे. अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईमुळे अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने टपरीधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी किंवा नियमांच्या अधीन राहून व्यवसायासाठी जागा निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.
शहरातील रस्ते मोकळे ठेवण्यासोबतच गरीब टपरीधारकांचा रोजगारही टिकवून ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने मानवी दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा टपरीधारकांकडून व्यक्त केली जात आहे.
No Comment! Be the first one.