पाठपुराव्याला यश; उर्वरित चार पदांसाठी 8 ऑक्टोबरपर्यंतची मुदत
लोकार्थ प्रतिनिधी प्रविण देशपांडे परभणी
जिल्हा परिषद प्रशाला, पेडगाव येथील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे परभणी तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी 8 सप्टेंबर रोजी शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाच्या पाठपुराव्याला यश आले आहे. शिक्षण विभागाने प्राथमिक विभागातील रिक्त असलेल्या तिन्ही पदांवर शिक्षकांची प्रतिनियुक्ती केली असून, निवेदनातील 50 टक्के मागण्या पूर्ण झाल्या आहेत.
निवेदनानंतर संतोष देशमुख यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला. त्याची दखल घेत गटशिक्षणाधिकार्यांनी सोमवारी पेडगाव जिल्हा परिषद प्रशालेस भेट देऊन शिक्षकांच्या रिक्त पदांची पाहणी केली. यावेळी नववी व दहावीच्या सुमारे 150 विद्यार्थ्यांनी नियमित गणित शिक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी करणारे पत्र शिक्षणाधिकार्यांना सादर केले होते.
शिक्षण विभागाने यापूर्वी शिवकन्या देवडे व डी. एम. डुकरे यांची प्रतिनियुक्ती केली होती. त्यानंतर मंगळवारी बी. पी. धरणे यांचीही प्रतिनियुक्ती करण्यात आली. त्यामुळे प्राथमिक विभागातील तिन्ही रिक्त पदे भरली आहेत. या कार्यवाहीबद्दल संतोष देशमुख यांनी शिक्षण विभागाचे आभार मानले. नव्याने रुजू झालेले बी. पी. धरणे यांचे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अविनाश गायकवाड यांनी ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते.
दरम्यान, प्रशालेतील राजपत्रित मुख्याध्यापक, माध्यमिक विभागातील गणित विषयाचा शिक्षक आणि दोन सेवक अशी एकूण चार पदे अद्याप रिक्त आहेत. विशेषतः नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी नियमित गणित शिक्षकाची नियुक्ती करणे आवश्यक असल्याचे संतोष देशमुख यांनी म्हटले आहे.
उर्वरित रिक्त पदे भरण्यासाठी शिक्षण विभागाला 8 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत सर्व रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. निर्धारित मुदतीत कार्यवाही न झाल्यास विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांच्या वतीने 8 ऑक्टोबरनंतर परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संतोष देशमुख यांनी दिला आहे.

No Comment! Be the first one.