लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे
जालना जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल पंपांवर ग्राहकांसाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत किंवा नाहीत, याची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी शशिकांत ह्याळ यांनी दिले आहेत. यासंदर्भातील पत्र दिनांक 28 सप्टेंबर 2026 रोजी जारी करण्यात आले आहे.
सार्वजनिकरित्या वितरित होणारे पेट्रोल व डिझेल कोणत्याही गैरप्रकाराशिवाय नागरिकांना नियमित उपलब्ध व्हावे, यासाठी पेट्रोल पंप परवानाधारकांची तपासणी करण्याचे मानके निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार प्रत्येक पेट्रोल पंपाची किमान एकदा तपासणी होणे आवश्यक आहे.
पेट्रोल व डिझेल पंपाची तपासणी करताना पेट्रोल पंपधारकाकडील जमिनीशी संबंधित कागदपत्रांची सखोल तपासणी करावी तसेच कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्यास त्याचा स्वतंत्र अहवाल जिल्हा कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, जालना जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपांवर स्वच्छतागृह, मोफत हवा भरण्याची सुविधा आणि मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याच्या तक्रारी दैनिक वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे पेट्रोल पंपांच्या तपासणीवेळी स्वच्छ व वापरण्यायोग्य शौचालय, स्वच्छ पिण्याचे पाणी, अग्निशमन यंत्रणा, प्राथमिक उपचार पेटी, हवा भरण्याची सुविधा, आपत्कालीन संपर्क क्रमांक, तक्रार नोंदवही, पेट्रोल-डिझेलचे दरफलक, ग्राहक तक्रार व्यवस्था, पाणी व स्वच्छता, योग्य सुरक्षा सूचना व फलक, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच इंधनाची गुणवत्ता व मोजमाप तपासणीची सुविधा उपलब्ध आहे किंवा नाही, याची खातरजमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वरीलपैकी कोणतीही सुविधा आढळून न आल्यास संबंधित पेट्रोल पंपधारकांना सूचना देऊन तसेच संबंधित कंपनीच्या सेल्स ऑफिसरच्या निर्देशानुसार आवश्यक कार्यवाही करून सविस्तर तपासणी अहवाल जिल्हा पुरवठा कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी विक्री अधिकारी BPCL, IOCL आणि HPCL जालना यांनाही पत्र देऊन, पेट्रोल पंपांवरील प्राथमिक सुविधा आढळून न आल्यास आपल्या स्तरावर नियमानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

No Comment! Be the first one.