लोकार्थ प्रतिनिधी गोपाल सातपुते
हिंगोली लोकशाहीची मूल्ये जपणे, अराजकतेच्या प्रवृत्तींना ठामपणे प्रत्युत्तर देणे आणि केंद्र सरकारच्या विकासाभिमुख कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांनी केले.
हिंगोली विधानसभा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ या पदयात्रा आणि जाहीर सभेप्रसंगी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून या भव्य पदयात्रेला सुरुवात झाली. शहरातील मुख्य मार्गावरून निघालेल्या या पदयात्रेत ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. गांधी चौक येथे जाहीर सभेने या पदयात्रेचा समारोप झाला.
यावेळी बोलताना सुनील राणे यांनी काँग्रेस पक्षाच्या धोरणांवर आणि भूमिकेवर जोरदार टीका केली. विरोधकांकडून देशात अराजकता पसरवण्याचे आणि दिशाभूल करण्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसने नेहमीच सत्तेच्या राजकारणाला प्राधान्य दिले असून लोकशाही मूल्यांची पायमल्ली केली आहे. अशा विघातक आणि अराजक प्रवृत्तींना जनता आता थारा देणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
केंद्र सरकारच्या कामगिरीचा गौरव करताना राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारताचा विकास, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, जनकल्याणकारी योजना आणि जागतिक स्तरावरील प्रतिष्ठा या सर्वच क्षेत्रांत ऐतिहासिक प्रगती साधली आहे. आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक दृढ करत विकसित भारताच्या दिशेने देशाची वाटचाल वेगाने सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
या सभेला भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांच्यासह माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हा प्रभारी संजय कौडगे, राज्यसभा सदस्य रामराव वडकुते, आमदार प्रज्ञाताई सातव, आमदार तान्हाजीराव मुटकुळे,जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, नितीन काळे, किरण पाटील, माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे, शशिकांत वडकुते, मिलिंद यंबल आदी प्रमुख नेते उपस्थित होते. या पदयात्रेला व जाहीर सभेला महिलांचा विशेष सहभाग लाभला असून भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No Comment! Be the first one.