लोकार्थ प्रतिनिधी अनिल पोरवाल
जवळा बाजार, हिंगोली : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष कृतीतून कौशल्ये आत्मसात करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिवनेरी माध्यमिक आश्रमशाळा, जवळा बाजार येथे ‘मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स’ प्रयोगशाळेचे दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले.
या उपक्रमाला JNK INDIA LTD यांच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) सहभागातून विशेष बळ मिळाले आहे.तसेच विज्ञान आश्रम, पाबळ यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधारित आणि अनुभवाधारित शिक्षणाची संधी निर्माण झाली आहे. ग्रामीण व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक कौशल्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन, समस्या सोडविण्याची क्षमता आणि स्वावलंबन विकसित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या प्रयोगशाळेचे उद्घाटन JNK INDIA LTD चे CEO श्री. दीपकजी भारुका, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री. नानासाहेब कदम, यांच्या शुभहस्ते करण्यात आले. हिंगोलीचे सहाय्यक संचालक श्री. ज्ञानेश्वर काकडे , दुर्गा हॉस्पिटलचे डॉ. राजकुमारजी भारुका, श्री गोपाल भारुका यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री विजयकुमार विभुते, राजू पवार, मंचकराव मुळे, त्र्यंबकराव डोंबे, भगवानराव सावंत, सय्यद सर,दीपक जाधव, ज्ञानेश्वर खल्लाळ, राजरत्न गायकवाड सर, आणि पालक वर्ग यांची उपस्थिती होती.
या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना चार प्रमुख क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव दिला जाणार आहे.
1.ऊर्जा आणि पर्यावरण – ऊर्जा बचत, अपारंपरिक ऊर्जा, पाणी व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धन.
2.गृह आणि आरोग्य – आरोग्य, स्वच्छता, पोषण, अन्नप्रक्रिया व घरगुती व्यवस्थापन.
3.शेती आणि पशुपालन – रोपवाटिका, सेंद्रिय खतनिर्मिती, आधुनिक शेती व पशुपालन.
4.अभियांत्रिकी– विद्युत उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स, लाकूडकाम, धातुकाम व दुरुस्तीची प्राथमिक कौशल्ये.
उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी या प्रयोगशाळेचा केवळ अभ्यासक्रमापुरता वापर न करता स्वतः प्रयोग करावेत, वस्तू तयार कराव्यात, स्थानिक समस्यांवर उपाय शोधावेत आणि कौशल्यांच्या बळावर स्वावलंबी बनावे, असे आवाहन केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये अधोरेखित केलेल्या अनुभवाधारित आणि व्यावसायिक शिक्षणाच्या उद्दिष्टांना पूरक ठरणारा हा उपक्रम आहे. शिकत शिकत काम करणे आणि कामातून शिकणे’ या संकल्पनेवर आधारित या प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, सर्जनशीलतेला आणि उद्योजकतेला चालना मिळणार आहे.
JNK INDIA LTD यांच्या CSR सहभागामुळे आणि विज्ञान आश्रम, पाबळ यांच्या मार्गदर्शनामुळे शिवनेरी माध्यमिक आश्रम शाळेत उभे राहिलेले हे कौशल्य शिक्षणाचे व्यासपीठ विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री. संजय परिहार,श्री. बळवंतराव चव्हाण; श्री. कैलास लाहोटी, तसेच संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
JNK INDIA LTD यांच्या CSR सहभागातून ग्रामीण व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणाची प्रत्यक्ष संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम शिक्षण आणि रोजगाराभिमुख कौशल्ये यांच्यातील दरी कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
No Comment! Be the first one.