मोटारपंप, टँकरसह साहित्य जप्त करून गुन्हा दाखल करणार
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळे नांदेड
नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) अंतर्गत शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातील अन्तेश्वर उच्च पातळी बंधारा, विष्णुपुरी उच्च पातळी बंधारा व रेणापूर सुधा लघु प्रकल्प तसेच नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) अंतर्गत उर्ध्व मानार प्रकल्प, लिंबोटी येथील संपूर्ण पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. या पाणीसाठ्याचा नियोजनानुसार पिण्यासाठी वापर व्हावा आणि अनधिकृत उपसा रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधितांना सूचना केल्या आहेत.
शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या 12 डिसेंबर 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार या आरक्षित पाणीसाठ्याचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित जलाशयावरील सर्व परवानाधारक शेतकऱ्यांनी पाणीसाठा केवळ पिण्यासाठी आरक्षित असल्याची नोंद घेऊन मोटारपंप, इंजिन, टँकर अथवा अन्य साधनांद्वारे पाणी उपसा करून सिंचन करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे
जलाशयाच्या परिसरात असलेले मोटारपंप, इंजिन, टँकर, स्टार्टर, केबल, सर्व्हिस वायर तसेच अन्य साहित्य संबंधितांनी स्वतःहून काढून घ्यावे. पाण्याचा अनधिकृत उपसा होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येईल. तसेच भरारी पथकाद्वारे मोटारपंप, इंजिन, टँकर, स्टार्टर, केबल, सर्व्हिस वायर आदी साहित्य जप्त करून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असलेल्या पाणीसाठ्याचे संरक्षण व उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी सर्व संबंधितांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

No Comment! Be the first one.