चारित्र्यावर संशय घेत मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप; पैसे न आणल्यास दुसरे लग्न करण्याची धमकी दिल्याची फिर्याद
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड
गंगापूर : फर्निचर घेण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये आणावेत, अशी मागणी करून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १३ जुलै २०२६ रोजी घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याबाबत ३५ वर्षीय विवाहितेने १ ऑक्टोबर रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, तिचा विवाह २२ जून २०१४ रोजी सलमान युनुस पठाण याच्यासोबत मुस्लिम रितीरिवाजानुसार झाला. लग्नानंतर सुरुवातीची काही वर्षे सासरच्या मंडळींनी चांगली वागणूक दिली. मात्र, अपत्य न झाल्याने पती व सासरच्या मंडळींच्या वागणुकीत बदल झाल्याचा आरोप विवाहितेने केला आहे.
पती व सासरच्या मंडळींकडून छोट्या-छोट्या कारणांवरून तसेच चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण, शिवीगाळ व मानसिक त्रास दिला जात असल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. तसेच माहेरच्या कुटुंबीयांशी बोलण्यासही अडथळा आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, सासरच्या मंडळींनी पतीला तिच्याबाबत चुकीची माहिती देऊन मारहाण करण्यास प्रवृत्त केले आणि घराबाहेर काढल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर माहेरच्या नातेवाईकांनी मध्यस्थी करून तिला पुन्हा सासरी पाठविले होते.
काही दिवसांनी पतीने घरातील फर्निचरसाठी माहेरहून एक लाख रुपये आणण्याची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. माहेरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने पैसे देणे शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर पतीने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून, पैसे न आणल्यास घरात घेणार नाही, तसेच दुसरे लग्न करण्याची किंवा जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
त्यानंतर १३ जुलै रोजी एक लाख रुपये आणण्याचा तगादा लावत मारहाण व शिवीगाळ करून घराबाहेर काढून दिले, तेव्हापासून आपण माहेरी राहत असल्याचे विवाहितेने पोलिसांना सांगितले.
या प्रकरणी पती सलमान युनुस पठाण, तसेच युनुस सरदार पठाण, अमर युनुस पठाण, शहारुख बब्बु पठाण, जब्बार जलील शेख, फरजाना जब्बार शेख आणि शबाना बब्बु पठाण सर्व राहणार शहागड तालुका अंबड यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास गंगापूर पोलीस करीत आहेत.
No Comment! Be the first one.