देणगी व दानपेटीतून तब्बल २१ लाख ८२ हजार ४७ रुपये जमा; भाविकांचा श्री गणरायाच्या चरणी श्रद्धेचा नजराणा
भोकरदन : अंगारिका चतुर्थीच्या निमित्ताने भोकरदन तालुक्यातील श्री गणपती संस्थान राजूर येथे भाविकांची मोठी गर्दी झाली. महाराष्ट्रासह विविध भागांतून आलेल्या भाविकांनी श्री गणरायाचे दर्शन घेत पूजा-अर्चा, अभिषेक करून आपल्या श्रद्धेनुसार देणगी अर्पण केली. या दिवशी संस्थानला देणगी तसेच दानपेटीतून मोठ्या प्रमाणात रक्कम प्राप्त झाली असून, एकूण २१ लाख ८२ हजार ४७ रुपये जमा झाल्याची माहिती संस्थानकडून देण्यात आली.
दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या अंगारिका चतुर्थीनिमित्त श्री गणपती संस्थानला विविध स्वरूपांत देणगी प्राप्त झाली. यामध्ये श्री गणपती संस्थान देणगी म्हणून ९ लाख ३१ हजार ८०० रुपये, अभिषेक देणगी ५३ हजार २५ रुपये, बांधकाम देणगी २८ हजार ११९ रुपये, तर मार्बल अर्पण देणगी म्हणून ३० हजार ८७३ रुपये जमा झाले. या सर्व देणग्यांची एकत्रित रक्कम १० लाख ४३ हजार ८१७ रुपये झाली.
याशिवाय मंदिर परिसरातील दानपेट्यांमध्येही भाविकांनी मोठ्या प्रमाणात रक्कम अर्पण केली. श्री दानपेटीतून ६ लाख ५४ हजार ९३० रुपये, तर बांधकाम दानपेटीतून ४ लाख ८३ हजार ३०० रुपये जमा झाले. या दोन्ही दानपेट्यांमधून मिळून ११ लाख ३८ हजार २३० रुपये प्राप्त झाले.
देणगी आणि दानपेटीतून प्राप्त झालेल्या दोन्ही रकमा एकत्रित केल्यानंतर अंगारिका चतुर्थीच्या दिवशी संस्थानला एकूण २१ लाख ८२ हजार ४७ रुपये प्राप्त झाले. मंदिराच्या विविध धार्मिक व विकासकामांसाठी भाविकांकडून मिळणाऱ्या या देणगीतून श्री गणपती संस्थानवरील भाविकांची श्रद्धा आणि विश्वास अधोरेखित झाला आहे.
अंगारिका चतुर्थीनिमित्त राजूर येथे पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दिवसभर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण होते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासन तसेच संबंधित यंत्रणांकडून आवश्यक नियोजन करण्यात आले होते. भाविकांनी शांततेत दर्शन घेत श्री गणरायाच्या चरणी आपली सेवा व श्रद्धा अर्पण केली.
बॉक्स : महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती
देणगीची मोजणी व संबंधित प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी यावेळी पंच म्हणून श्री गणपती संस्थानचे विश्वस्त गणेश साबळे उपस्थित होते. तसेच अधीक्षक म्हणून प्रशांत दानवे, मंडळ अधिकारी राम कांबळे, तलाठी व्ही. आर. गरड, श्रीमती सांची दहिजे, सीमा उघडे, निकिता चोपडे, शीतल लव्हाळे, अंकुश मनभरे, मंगेश कोल्हे यांच्यासह महसूल विभागातील तलाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देणगीचा तपशील
- श्री गणपती संस्थान देणगी : ₹९,३१,८००
- अभिषेक देणगी : ₹५३,०२५
- बांधकाम देणगी : ₹२८,११९
- मार्बल अर्पण देणगी : ₹३०,८७३
- देणगी एकूण : ₹१०,४३,८१७
दानपेटीतील रक्कम
- श्री दानपेटी : ₹६,५४,९३०
- बांधकाम दानपेटी : ₹४,८३,३००
- दानपेटी एकूण : ₹११,३८,२३०
एकूण जमा : ₹२१,८२,०४७
अक्षरी : एकवीस लाख ब्याऐंशी हजार सत्तेचाळीस रुपये फक्त.

No Comment! Be the first one.