हिंगोली जिल्ह्यात धक्क्यांचे सत्र सुरूच; २४ तासांत पुन्हा एकदा भूकंपाचा तिसरा धक्का, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
लोकार्थ प्रतिनिधी
हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सत्र सुरूच असून अवघ्या २४ तासांत तिसरा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी दोन भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी पहाटे १:३१ वाजता पुन्हा २.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला.
केंद्रबिंदू औंढा तालुक्यात
शनिवारी सकाळी एकापाठोपाठ एक दोन मोठे धक्के बसल्यानंतर, रविवारी मध्यरात्री १:३१ वाजेच्या सुमारास २.५ रिश्टर क्षमतेचा भूकंपाचा तिसरा धक्का नोंदवला गेला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यात आहे. – विकास माने, उपविभागीय अधिकारी, वसमत.
भूकंपाचे केंद्र बदलल्याने चिंता वाढली
- हिंगोली जिल्ह्यात सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. यापूर्वी वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे, तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील वसई, गढाळा आणि म्हैसगव्हाण परिसर भूकंपाचे केंद्र ठरले होते.
- आता केंद्रबिंदू सिद्धेश्वर-दुधाळा परिसरात सरकल्याने भूकंपाचे केंद्र बदलत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट अधिक गडद झाले आहे.
- सततच्या हादऱ्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात.
- तसेच नागरिकांना भूकंपाच्या काळात घ्यावयाची खबरदारी आणि सुरक्षिततेबाबत तातडीने मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.
No Comment! Be the first one.