लोकार्थ प्रतिनिधी कार्तिक राजगुरू कन्नड
दि.6 इंडसइंड बँकेची उपकंपनी असलेल्या इंडसइंड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. मुंबई मधील सेवेदरम्यान झालेल्या कथित गैरवर्तन, मारहाण, बेकायदेशीर बदली आणि आर्थिक-प्रशासकीय अनियमिततेच्या विरोधात भोकनगाव ता. कन्नड येथील माजी चीफ मॅनेजर विजय वसंतराव खरे यांनी राज्यभर तक्रारींचा पाऊस पाडला असून अखेर न्यायासाठी थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण? – तक्रारदाराच्या जबाबातून
तक्रारदार विजय खरे यांनी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात दि. ४/१०/२०२६ रोजी दिलेल्या लेखी जबाबानुसार, ते मार्च २०२४ मध्ये कंपनीत चीफ मॅनेजर – इन्फ्रास्ट्रक्चर व प्रोजेक्ट मॅनेजमेंट पदी मुंबई येथे रुजू झाले होते.
त्यांच्या आरोपानुसार –
१) मानसिक त्रासाची सुरुवात : डिसेंबर २०२४ नंतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने मानसिक त्रास देण्यास सुरुवात झाली.
दि. १२/१२/२०२४ रोजी कंपनीचे अधिकारी सुमीतकुमार हांडा यांनी बजाजनगर, छ. संभाजीनगर येथील शाखेत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत बजाजनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २६२/२०२४ दाखल असून तो तपासाधीन आहे. ते लग्नासाठी रजेवर असताना त्यांना अल्पशा नोटीसीत मुंबईहून थेट कालीकत (केरळ) येथे बदलीचे पत्र देण्यात आले.
2) अपघातानंतरही रजा नाकारली : दि. १७/०२/२०२५ रोजी आईला दवाखान्यात घेऊन जाताना त्यांचा अपघात होऊन पायाला मेजर इंज्युरी झाली. तरीही वैद्यकीय रजा नाकारून लॅपटॉपचा एक्सेस काढून घेण्यात आला, असा आरोप आहे.अखेर दि. २७/०२/२०२५ रोजी कंपनीने त्यांना सेवेतून मुक्त केल्याचे पत्र दिले.
या सर्व प्रकरणात कंपनीने भारतीय करार अधिनियम १८७२ मधील तरतुदींचे उल्लंघन केले असल्याचा दावा खरे यांनी केला आहे.
खरे यांनी दिलेल्या निवेदनात कंपनीतील श्री. राकेश जैन, श्री. अखिलेश गुलेरिया, श्री. महेश त्रिलोककर, श्री. निरंजन बाबू, श्री. कौस्तुभ नंदी, श्री. तरसेम सिंग, श्री. सुमीत हंडा, श्री. सचिन शिलावत, श्री. राजेश्वरन माधवन, श्री. सुशील एस. कुमार, श्री. संतोष सिंग, श्री. सिमोन जॉन आणि श्रीमती अबेगेल फर्नांडिस यांच्यासह इतर संबंधितांच्या कार्यपद्धती आणि आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.
महत्वाची सूचना : वरील सर्व नावे व आरोप हे तक्रारदार विजय खरे यांनी त्यांच्या निवेदनात व अर्जात केलेले आहेत. याबाबत संबंधित कंपनी किंवा कोणत्याही अधिकृत तपास यंत्रणेकडून अद्याप अधिकृत दुजोरा किंवा खुलासा आलेला नाही. त्यामुळे या आरोपांची सत्यता सक्षम व स्वतंत्र तपास यंत्रणेमार्फतच निश्चित होणे आवश्यक आहे.
IRDA पासून CVC पर्यंत धाव, पण FIR नाही – म्हणून आंदोलन
न्यायासाठी खरे यांनी दि. ४ जून २०२५ पासून भारतीय कामगार विभाग, नवी दिल्ली / मुंबई / नागपूर- इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (IRDA)- दि. ३१/०७/२०२५ रोजी केंद्रीय दक्षता आयोग (CVC) नवी दिल्ली – तक्रार क्र. ११८७०२/२०२५
यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. त्या सर्व प्रलंबित आहेत.
त्यानंतर त्यांनी दि. १०/०९/२०२६ व ११/०९/२०२६ रोजी आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन तक्रारी दाखल केल्या (टोकन क्र. TAL/HOMD/KNN/२०२६/६ व DIS/HOMD/CHSN/२०२६/१८६). त्यावर कार्यवाही न झाल्याने दि. २६/०९/२०२६ रोजी कन्नड ग्रामीण व पोलीस अधीक्षक (ग्रामीण) छ. संभाजीनगर यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावर कन्नड ग्रामीण पोलिसांनी दि. ४/१०/२०२६ रोजी समजपत्र देऊन म्हटले आहे की, “तक्रारदाराने नमूद केलेल्या घटना मुंबई, नागपूर, कालीकत (केरळ), नवी दिल्ली येथील असून त्या आमच्या हद्दीतील नसल्याने संबंधित ठिकाणी पत्रव्यवहार करावा. आम्ही कायदेशीर मदतीच्या भूमिकेत आहोत. अर्ज पोस्टे स्तरावर फाईल केला आहे.”
पोलिसांकडून प्रतिसाद न मिळाल्याने खरे यांनी दि. ४/१०/२०२६ रोजी कन्नड शहर पोलीस स्टेशनला अर्ज देऊन दि. ५/१०/२०२६ रोजी सकाळी १० वाजता पिशोर नाका, कन्नड येथे मंडप व स्पीकरसह शांततापूर्ण रास्ता रोको व धरणे आंदोलन करण्याची पूर्वसूचना दिली होती. यासाठी त्यांनी तहसीलदार व DySP कन्नड यांनाही कळविले होते.
प्रमुख मागण्या
१) संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ FIR दाखल करावा. २) कंपनीतील कथित आर्थिक गैरव्यवहार, करार, अंतर्गत ई-मेल व निर्णयांची फॉरेन्सिक तपासणी करावी.
३) खासगी विमा क्षेत्रातील पारदर्शकतेसाठी हा प्रकार थांबवावा.
४) संपूर्ण प्रकरणाची CBI किंवा अन्य सक्षम स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून अहवाल DGP मुंबई यांना सादर करावा.
कोणावरही आरोप असले तरी निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर आले पाहिजे. दोष सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी,” अशी भूमिका खरे यांनी मांडली असून, आता पोलीस अधीक्षक (ग्रामीण) व CVC / IRDA च्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



No Comment! Be the first one.