२०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; सात दिवसांत नियुक्ती न झाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत आंबिलवादे
पैठण : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई यांच्या पवित्र जन्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र आपेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत गेल्या एक वर्षापासून शिक्षक आणि मुख्याध्यापकच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत सुमारे २०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शिक्षक आणि मुख्याध्यापकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.
शिक्षक व मुख्याध्यापकांची नियुक्ती करावी, यासाठी शालेय समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर औटे, स्वाती औटे, सोनाली मिसाळ, मनीषा पवार तसेच ग्रामपंचायत सदस्य वैजनाथ औटे यांनी अनेकदा शिक्षण विभागाकडे निवेदने दिली. मात्र वर्षभरानंतरही यावर ठोस कार्यवाही झालेली नाही.
दरम्यान, छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल पाटील राऊत, अनंत औटे, शेतकरी संघटनेचे नेते ज्ञानदेव मुळे आणि साईनाथ कर्डिले यांनी शिक्षण विभागाला निवेदन देत सात दिवसांत शिक्षक व मुख्याध्यापकांची नियुक्ती न झाल्यास शाळेला कुलूप ठोकून शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
गट शिक्षणाधिकारी मनोज चव्हाण आणि सतीश आखेगावकर यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
No Comment! Be the first one.