दुष्काळी परिस्थितीत तातडीने रोजगार उपलब्ध करून द्यावा; शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्याचीही मागणी
लोकार्थ प्रतिनिधी सुजित शिंदे धाराशिव
धाराशिव : जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतीची कामे ठप्प झाल्याने शेतमजुरांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शेतमजुरांना तातडीने रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन सेना, धाराशिव जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दुष्काळी परिस्थितीचा विचार करून जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तातडीने मोठ्या प्रमाणात कामे सुरू करावीत. यामध्ये माती नाला खोलीकरण, तलाव, बंधारे, रस्ते दुरुस्ती, वृक्षारोपण तसेच इतर सार्वजनिक कामांचा समावेश करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. प्रत्येक शेतमजुराला 10000 रुपये अनुदान देण्याची मागणीही करण्यात आली आहे. महात्मा फुले महामंडळाचे कर्ज बेरोजगार तरुणांना तात्काळ वाटप करण्यात यावे महिला बचत गटांचे कर्ज माफ करण्यात यावे महिला शेतमजुरांचे फायनान्स कर्ज माफ करण्यात यावे तसेच महिलांसाठी रोजगाराची स्वतंत्र व्यवस्था करून शासनाच्या विविध दुष्काळी मदत योजनांचा लाभ शेतमजुरांना मिळवून द्यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, कळंब तालुक्यातील मौजे हसेगाव (शि) येथील गट क्रमांक २२२ मधील शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण करून शेती केली जात असल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेने केला आहे. संबंधित गायरान जमीन ही अनुसूचित जाती व मागासवर्गीय प्रवर्गातील भूमिहीन नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. अतिक्रमणाची प्रत्यक्ष पाहणी करून नियमानुसार कारवाई करावी आणि अतिक्रमित जमीन भूमिहीन नागरिकांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
शेतमजुरांच्या रोजगाराचा प्रश्न तसेच गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न तातडीने सोडवावा; अन्यथा १५ दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल हजारे यांच्यासह मुजीब भाई पठाण सतपाल बनसोडे गौतम बनसोडे सुरज वाघमारे बालाजी गवळी व ईतर महिला कार्यकर्त्यां व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
No Comment! Be the first one.