२९ कोटींची पाणीपुरवठा योजना असूनही पाण्यासाठी नागरिकांची भटकंती…
लोकार्थ रिपोर्ट चंद्रकांत अंबिलवादे पैठण
पैठण ते छत्रपती संभाजीनगरला जाणारा महामार्ग रोखण्याचा महिलांचा इशारा…
पैठण तालुक्यातील चितेगाव येथील दूषित पाण्याने त्रस्त झालेल्या व
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चितेगाव परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने संतप्त महिलांनी मंगळवारी रोजी चितेगाव ग्रामपंचायतीवर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले.
गेल्या काही दिवसापासून या पंचक्रोशीतील नागरिक घरातील बोरवेलला येणाऱ्या दूषित पाण्यामुळे त्रस्त असताना
या गावात नियमित पिण्याचे पाणी मिळत नसल्याने महिलांमध्ये तीव्र स्थानिक प्रशासनाच्या विरुद्ध
संतापाची लाट निर्माण झाली.
चितेगाव हे औद्योगिक वसाहतीमुळे झपाट्याने विस्तारलेले गाव असून, गावाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते व इतर मूलभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे चितेगाव ग्रामपंचायतीने नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी आंदोलनकर्त्या महिलांनी केल्या आहे.
या चितेगावसाठी जल जीवन मिशन/जलस्वराज्य टप्पा-२ अंतर्गत सुमारे २९ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन गावात थातूरमातूर पद्धतीने काम केलेले आहे.
एवढ्या मोठ्या निधीतून पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असतानाही नागरिकांना नियमित पाणी मिळत नसेल, तर या योजनेचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत का पोहोचत नाही, असा सवाल महिलांनी उपस्थित केला.
“२९ कोटींची योजना नेमकी कुठे आहे? कागदावर योजना आणि प्रत्यक्षात पाण्यासाठी भटकंती, अशी परिस्थिती का?” असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्या महिलांनी उपस्थित केला.
ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठ्याची समस्या सोडवून नियमित व पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी महिलांनी केली. समस्या तातडीने सोडविली नाही तर आगामी काळात पैठण–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही महिलांनी दिला.
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासन आता या पाणीटंचाईवर कोणती ठोस उपाययोजना करते आणि २९ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना कधी मिळतो, याकडे चितेगावकरांचे लक्ष लागले आहे.
➡️ दरम्यान या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य कृष्णा गिधाने यांनी लोकार्थ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की चितेगाव परिसरातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्याचे आमदार विलास बापू भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना तातडीने करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद, पंचायत समिती विभागाच्या स्तरावर अंमलबजावणी करण्याचे काम हाती घेतल्याचे सांगितले आहे…
No Comment! Be the first one.