२५ नोव्हेंबरपासून शाळा नियमित सुरू
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळे
नांदेड – जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नांदेड जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील दिवाळी सुट्टी जाहीर केली आहे. त्यानुसार ५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्टी राहणार आहे.
जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना हे नियोजन लागू राहणार आहे. २४ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीची सार्वजनिक सुट्टी असल्याने दिवाळीनंतर शाळा २५ नोव्हेंबर २०२६ रोजी बुधवारपासून नियमित सुरू होतील.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये रविवार, सार्वजनिक सुट्ट्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातील सुट्ट्या, शाळा व संस्थांना परवानगीने घोषित करता येणाऱ्या सुट्ट्या तसेच दिवाळी सुट्टी वगळता एकूण २३७ कार्यदिनांचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर वगळता इतर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दीर्घ सुट्ट्या अनुज्ञेय नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, दीर्घ सुट्ट्यांच्या कालावधीत येणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्या संबंधित शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लागू राहतील.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद नांदेड यांनी जिल्ह्यातील सर्व प्राचार्य व मुख्याध्यापकांना याबाबत निर्देश दिले आहेत.

No Comment! Be the first one.