नाशिक : लोकार्थ प्रतिनिधी
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर नवरात्रोत्सवानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन सज्ज झालं आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रोत्सवाच्या काळात गडावरील तसेच परिसरातील खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
नवरात्रोत्सवात श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह विविध भागांतून भाविक गडावर येतात. या काळात हॉटेल्स, भोजनालये, मिठाई दुकाने, पेढा व प्रसाद विक्री केंद्रे तसेच तात्पुरत्या खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होते. त्यामुळे अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छतेच्या निकषांची तपासणी केली जाणार आहे. अन्नविषबाधेसारख्या घटना टाळणे आणि भाविकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल सुरक्षित आहे का, तयार अन्नपदार्थ योग्य तापमानात साठवले जातात का, तसेच ते धूळ, माश्या आणि इतर कीटकांपासून सुरक्षित ठेवले जातात का, याची पडताळणी करण्यात येईल. आस्थापनांमधील स्वच्छता, अन्नपदार्थ हाताळण्याची पद्धत, भांडी व उपकरणांचा वापर आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील तरतुदींचे पालन यांचीही तपासणी केली जाणार आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, पेढा, तयार खाद्यपदार्थ आणि त्वरित खराब होऊ शकणाऱ्या अन्नपदार्थांची योग्य पद्धतीने साठवणूक करणे आवश्यक आहे. यावर लक्ष दिले जाणार आहे.
No Comment! Be the first one.