आयशरच्या धडकेत खुलताबाद तालुक्यातील तीन तरुणांचा मृत्यू; एक जखमी
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : तुळजापूर येथून ज्योत घेऊन परतत असताना चितेपिंपळगाव येथील छत्रपती संभाजी राजे सहकारी साखर कारखान्याजवळ झालेल्या भीषण अपघातात खुलताबाद तालुक्यातील तीन तरुणांचा मृत्यू झाला, तर एक तरुण जखमी झाला. भरधाव वेगाने आयशर वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानंतर तरुणांना काही अंतरापर्यंत फरफटत नेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या घटनेमुळे जाफरवाडी आणि गोळेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
या अपघातात अक्षय राजपूत (वय २८, रा. जाफरवाडी, ता. खुलताबाद), अमोल औटे (वय ३०, रा. गोळेगाव, ता. खुलताबाद) आणि गोरख मस्कर (वय ३०, रा. गोळेगाव, ता. खुलताबाद) यांचा मृत्यू झाला. शुभम आदाने हा तरुण जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ज्योत घेऊन धावणाऱ्या तरुणाच्या सुरक्षेसाठी दुचाकीवरून जात होते तरुण
मिळालेल्या माहितीनुसार, हे तरुण तुळजापूर येथून ज्योत घेऊन परतत होते. ज्योत घेऊन जाणारा एक तरुण रस्त्यावरून धावत जात असताना त्याच्या सुरक्षेसाठी तरुण दुचाकीवरून त्याच्यासोबत जात होते. याचदरम्यान 10 ऑक्टोंबर 2024 रोजी सायंकाळी चितेपिंपळगाव येथील छत्रपती संभाजी राजे सहकारी साखर कारखान्याजवळ आयशर वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली.
तीन ते चार किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आयशर वाहनाच्या धडकेनंतर तरुणांना वाहनाने जवळपास तीन ते चार किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. या भीषण अपघातात अक्षय राजपूत, अमोल औटे आणि गोरख मसकर यांचा मृत्यू झाला, तर शुभम आदाने वय वीस वर्षे राहणार चिमणपिरवाडी हा तरुण जखमी झाला. त्याला तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. एपीआय गोकुळ ठाकूर हे पुढील तपास करत आहे…
दोन गावांवर शोककळा
एकाच अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाल्याने जाफरवाडी आणि गोळेगाव गावांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरुणांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या अपघाताबाबत पुढील तपास सुरू असून, अपघाताचे नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण तपशील तपासानंतर स्पष्ट होणार आहे, असे करमाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी सांगितले तर एपीआय गोकुळ ठाकूर हे पुढील तपास करत आहे…
No Comment! Be the first one.