मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी १४ ऑक्टोबरला जालन्यात अपंग जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे
दिव्यांग बांधवांना दरमहा सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर सकाळी ११ वाजता महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चाच्या पूर्वतयारीसाठी बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी जालना येथे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
दिव्यांगांना आर्थिक आधार मिळावा आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी दरमहा सहा हजार रुपये मानधन देण्याची मागणी अपंग जनता दलाच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. या मागणीसंदर्भात यापूर्वी राज्य सरकारला निवेदने देण्यात आली; मात्र मागणीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईतील आझाद मैदानावर महामोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे
अपंग जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार शेख अनिस, राज्य कार्याध्यक्ष भाऊसाहेब दसपुते, राज्य कार्याध्यक्ष झाकीर शेख, राज्य कार्याध्यक्ष गणेश मगरे, राज्य कार्याध्यक्ष फेजर खान आणि जालना जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांच्या नेतृत्वाखाली हा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात राज्यभरातून पाच ते सहा हजार दिव्यांग बांधव सहभागी होण्याची अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.
जालना जिल्ह्यातून मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव सहभागी होणार
मुंबई येथे होणाऱ्या महामोर्चासाठी जालना जिल्ह्यातूनही असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दिव्यांग बांधव सहभागी होणार आहेत. या अनुषंगाने मोर्चाच्या नियोजनासाठी बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत मुंबईला जाण्याचे नियोजन, दिव्यांग बांधवांची उपस्थिती, प्रवास व्यवस्था आणि महामोर्चाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तरी अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच दिव्यांग बांधवांनी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे आवाहन अपंग जनता दलाचे राज्य कार्याध्यक्ष भाऊसाहेब दसपुते, जालना जिल्हाध्यक्ष राहुल मुळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सविता बोराडे, जालना शहराध्यक्ष काजी कामरान, तालुकाध्यक्ष करण डोईफोडे आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
No Comment! Be the first one.