मोबिलीटी क्षेत्रात परिणामकारक कार्यासाठी दिला जातो सन्मान
लोकार्थ प्रतिनिधी
बंगळुरू – शहरातील ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ या विविध संस्थांच्या मंचला मुव्ह इन सिंक कडून दिला जाणारा ‘चेंज मेकर’ ( बदल घडवणारे ) पुरस्कार मिळाला आहे. मंचच्या वतीने समन्वयक रूपेश कलंत्री यांनी हा मान स्वीकारला. देशभरात मोबिलीटी ( परिवहन) क्षेत्रात उल्लेखनीय, परिणामकारक काम करणा-व्यक्ती, संस्था आणि कार्पोरेट कंपन्यांच्या कामाची दखल घेण्यात आली. यावेळी बोईंग, विजा, जेनपॅक, बायोकॉन, मायक्रोसॉफ्ट, ॲमाझॉन सारख्या कंपन्यांना देखिल सन्मानित करण्यात आले.
फुटपाथचा प्रश्न असो वा दिव्यांगांसाठी सुविधांचा लढा. सॉफ्टवेयर बनवण्याची कल्पकता किंवा कर्मचा-यांना मेट्रो वापरण्यासाठी प्रेरित करणे. वाहतूक सोपी होईल, कोंडी कमी होईल अशा जीवन सुकर करणा-या प्रयत्नांना बेंगळुरू येथे आयोजित भव्य ‘मोबिलीटी सिम्पोसियम २०२६’ मध्ये गौरवण्यात आले.
‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ मंच डबल द बस’ या अभियानातून शहर बस वाहतूक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करत आहे. शहराला २०२३ मध्येच १३५ एसी इलेक्ट्रिक बस मिळणे अपेक्षित होते. कंपनी फक्त पुढच्या तारखा देत होती. मंचने प्रशासनाला पत्रव्यवहार केला. चर्चा, स्मरणपत्रे, माहिती अधिकार, प्रथम अपील, सुनावणी, आंदोलने केली. त्यामुळे हा विषय चर्चेत आला. वर्षभराच्या लढ्यांनंतर शहराला ६१ बस मिळाल्या. यात प्रसारमाध्यमांची भूमिकाही महत्वाची होती, असे मत रूपेश कलंत्री यांनी सोहळ्यात मांडले. सक्षम सार्वजनिक वाहतुकीला पर्याय नसल्याचे वृत्तपत्रांनी सातत्याने प्रसिद्ध केले. शिवाय महापौर समीर राजूरकर आणि मनपा आयुक्त अमोल येडगे यांचेही त्यांनी अभिनंदन केले.सोबत काम करून शहर कोंडीमुक्त, प्रदूषण मुक्त करण्याची गरज व्यक्त केली. मिळालेल्या ६१ बस कोणतेही कारण न देता तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी आम्ही पर्यावरण प्रेमीने पुन्हा एकदा केली आहे.
या संस्थांचा सहभाग
औदुंबर फाऊंडेशन (कला कट्टा), इकोग्रीन फाऊंडेशन, क्रेझी फ्रेंड्स, हॅप्पी हेल्दी ग्रुप, दीपशिखा फाऊंडेशन, प्लॉगर्स ग्रुप, क्रीडा संकुल मित्रमंडळ, बेस्ट फाऊंडेशन, जनसहयोग प्रतिष्ठान, गरवारे कम्युनिटी सेंटर, प्रयास युथ क्लब, रीड ॲंड लीड फाऊंडेशन, संडे क्लब या संस्था मंचच्या विविध उपक्रमात सहभागी होतात.
No Comment! Be the first one.