सजवलेल्या बैलगाडीतून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक; भाविकांची मोठी उपस्थिती
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील ग्रामदैवत लक्ष्मीमातेच्या नवीन मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिरावरील कलशारोहण सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यानिमित्ताने सजवलेल्या बैलगाडीतून लक्ष्मीमातेची मूर्ती व कलशाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्ये, आकर्षक वेशभूषा आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
लासूर स्टेशन येथील चिमाजीनगर (बाजारतळ) परिसरात लक्ष्मीमातेचे पुरातन मंदिर होते. कालांतराने मंदिर जीर्ण झाल्याने त्याचा जीर्णोद्धार करून नवीन मंदिर उभारावे आणि लक्ष्मीमातेच्या मूर्तीची नव्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करावी, अशी भाविकांची अनेक दिवसांपासून इच्छा होती. भाविकांची ही भावना लक्षात घेऊन भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील जाधव आणि पंचायत समिती सदस्य सुनील पाखरे यांनी आमदार प्रशांत बंब यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांतून मंदिराच्या कामासाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. उर्वरित काम गावकऱ्यांच्या लोकसहभागातून पूर्ण करण्यात आले.
मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर रविवारी सकाळी दहा वाजता धार्मिक सोहळ्याला सुरुवात झाली. सजवलेल्या बैलगाडीत लक्ष्मीमातेची मूर्ती व कलश ठेवून ढोल-ताशांच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि भक्तिमय वातावरणात निघालेली ही मिरवणूक संस्थान गणपती मंदिरापर्यंत नेण्यात आली. तेथून पुन्हा लक्ष्मीमातेच्या नवीन मंदिराकडे मिरवणूक आणण्यात आली. या वेळी अनेक महिला व पुरुष भाविकांनी सहभाग नोंदविला. पारंपरिक वेशभूषेतील भक्तांच्या सहभागाने मिरवणुकीला विशेष रंगत आली.
यानंतर नवीन मंदिरात विधिवत लक्ष्मीमातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मंदिराच्या शिखरावर कलशारोहणाचा सोहळाही मोठ्या उत्साहात पार पडला. ग्रामदैवताच्या नवीन मंदिराचे स्वप्न साकार झाल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी बाजार समितीचे संचालक सुनील पाखरे, वैभव दसे, नागसेन पाखरे, विशाल पाखरे, मृत्युंजय युवा ग्रुपचे शरद पाटील गायके, संदीप पाखरे, नागेश पाखरे, गुलाब वाघ, सागर धनुरे, सनी वाकळे, ईश्वर नरोडे, मनोज पाखरे, सुदाम नरोडे, प्रदीप वाकळे, अक्षय चव्हाण, विजय वाकळे, संदीप हिवाळे यांच्यासह पाखरे परिवारातील सदस्य तसेच गावातील महिला, पुरुष आणि भाविकांनी परिश्रम घेतले.
No Comment! Be the first one.