प्राचीन धार्मिक परंपरेला उजाळा; नऊ दिवस भक्तिमय वातावरण, अष्टमीला यज्ञ तर दसऱ्याला सीमोल्लंघन
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड
गंगापूर : तालुक्यातील गोदावरी नदीच्या तीरावर वसलेल्या ऐतिहासिक श्री क्षेत्र जामगाव येथे आई जगदंबा देवीच्या नवरात्रोत्सवाला ‘उदो उदो’च्या गजरात भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, नऊ दिवस देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून परिसरात प्रसिद्ध असलेल्या जगदंबा मातेच्या उत्सवामुळे जामगाव परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
जामगावला प्राचीन धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. श्री जंबुकेश्वर महादेवाच्या नावावरून या क्षेत्राला जामगाव हे नाव पडल्याची परंपरा सांगितली जाते. प्रभू श्रीरामांच्या वनवासाशीही या भूमीचा संबंध जोडला जातो. पूर्वी या भागात अभयारण्य असल्याचे सांगितले जाते. जुन्या जामगावमध्ये गावाच्या चारही दिशांना गणेशमूर्तींची स्थापना करून ऋषिमुनींनी मोठा यज्ञ केला होता, अशी आख्यायिका आहे. या यज्ञाचे अवशेष म्हणून जुन्या जामगाव परिसरात आजही मोठ्या प्रमाणावर भस्म आढळत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
नऊ दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
नवरात्रोत्सवाच्या काळात महिला आणि भाविक नऊ दिवस उपवास करतात. काही भक्त मंदिरात घटस्थापना करून देवीच्या सेवेत राहतात. दररोज सकाळी आणि संध्याकाळी आरती केली जाते. संध्याकाळच्या आरतीसाठी संपूर्ण गावातील नागरिक आणि भाविक मंदिरात एकत्र येतात. अष्टमीच्या दिवशी मोठ्या यज्ञाचे आयोजन केले जाते, तर दसऱ्याच्या दिवशी ग्रामस्थांकडून पारंपरिक सीमोल्लंघन करण्यात येते. या धार्मिक परंपरांमुळे नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीची तीन पीठे
जामगाव येथील आई जगदंबा देवीच्या मंदिराला अनेक शतकांची परंपरा असल्याचे सांगितले जाते. चैत्र पौर्णिमेला येथे देवीची मोठी यात्रा भरते. मंदिरात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती अशी देवीची तीन प्रमुख पीठे आहेत. या देवीच्या दर्शनासाठी गंगापूर तालुक्यासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या श्रद्धेने येतात.
पुनर्वसनानंतरही जपला धार्मिक वारसा
जायकवाडी धरणामुळे १९७४ मध्ये जामगावचे पुनर्वसन करण्यात आले. त्यावेळी जुन्या गावातील श्री जगदंबा माता, गणपती, महादेव, विठ्ठल-रुक्मिणी आदी देवतांच्या मूर्ती वाजतगाजत नव्या गावात आणण्यात आल्या. कै. वे. शा. सं. बबनगुरुजी खोचे (दादा) यांच्या आचार्यत्वाखाली या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
गावाचे पुनर्वसन झाले असले, तरी ग्रामस्थांनी आपल्या पूर्वापार धार्मिक परंपरा आजही श्रद्धेने जपल्या आहेत. चैत्र पौर्णिमेच्या यात्रेदरम्यान सकाळी महावस्त्र आणि कीर्तिध्वजाची मिरवणूक काढण्यात येते. गावातील प्रमुख व्यक्तींच्या हस्ते देवीला महावस्त्र अर्पण करून अभिषेक, आरती आणि महापूजा केली जाते. दिवसभर भाविकांकडून देवीला वस्त्र व नैवेद्य अर्पण केला जातो.
यात्रेतील विशेष आकर्षण असलेल्या बारा बैलगाड्या ओढण्याच्या पारंपरिक कार्यक्रमात गावासह पंचक्रोशीतील नागरिक सहभागी होतात. आई जगदंबेवरील श्रद्धा, प्राचीन धार्मिक वारसा आणि पिढ्यान्पिढ्या जपल्या गेलेल्या परंपरांमुळे जामगावच्या या उत्सवाला विशेष महत्त्व आहे.


No Comment! Be the first one.