खळवाडी परिसरात मध्यरात्री चोरी; घराच्या मागील भिंतीतील वीट काढून चोरट्यांचा प्रवेश
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत आंबिलवादे
पैठण शहरातील खळवाडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धुमाकूळ घालत दोन मोटारसायकली, मोबाईल आणि १० हजार रुपये रोख असा एकूण सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खळवाडी परिसरातील रहिवासी संतोष जमनराव भालेकर यांनी नेहमीप्रमाणे त्यांची हिरो होंडा पॅशन लाल रंगाची मोटारसायकल क्रमांक MH 20 EF 0807 घरासमोर उभी केली होती. रात्री कुटुंबीय झोपल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घराच्या पाठीमागील भिंतीतील वीट काढून घरात प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील मोबाईल तसेच डब्यात ठेवलेली १० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. त्यानंतर घराबाहेर उभी असलेली भालेकर यांची मोटारसायकलही चोरट्यांनी लंपास केली.
याच परिसरातील रहिवासी राजेंद्र श्रीधर भिसे यांची जुनी मोटारसायकल क्रमांक MH 16 CU 4676 देखील चोरट्यांनी चोरून नेली.
या घटनेची तक्रार पैठण पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चोरीला गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ५० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड पुढील तपास करीत आहेत.
No Comment! Be the first one.