लोकार्थ प्रतिनिधी,विजय चौधरी खुलताबाद
दुष्काळावर मात करण्यासाठी पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने सेवा संकल्प अभियानातून जलसंधारणाला लोकसहभागाची जोड देत वनराई बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणी आडवा पाणी जिरवा जलसंधारणाला चालना देण्यासाठी सेवा संकल्प अभियान अंतर्गत पंचायत समिती खुलताबाद च्या वतीने गटविकास अधिकारी गिरीश सोनार व कृषी अधिकारी हणमंत बोयनर यांच्या मार्गदर्शनाखाली माझी सेवा माझे योगदान उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये बोडखा गंधेश्वर येथील ग्रामस्थांच्या सहभागातून वनराई बंधारा उभारण्यात आला. पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेवर आधारित या मोहिमेमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग शेतीसाठी करण्यास मदत होणार आहे. वनराई बंधाऱ्यामुळे पिकांना पाणी उपलब्ध होण्याबरोबरच विहिरी आणि परिसरातील अन्य जलस्रोतांच्या पाणी पातळीत वाढ होण्यासही हातभार लागणार आहे. लोकसभागातून राबवण्यात आलेल्या उपक्रमामुळे जलसंधारणा बाबत जनजागृती होऊन दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी बळ मिळणार आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामात लोकसहभाग महत्त्वाचा असून वनराई बंधाऱ्याच्या निर्मितीतून पाण्याचे संवर्धन आणि उपलब्ध जलस्रोतांचा अधिकाधिक उपयोग करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे कृषी अधिकारी हणमंत बोयनर यांनी सांगितले. यावेळी कृषी विभागाचे विस्तार अधिकारी राजुल पाटील, प्रतिभा कांबळे, दीपक बागुल, मंगेश शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी संगीता लोणकर, जाकीर शहा, आक्रम पटेल, कलीम शहा आदी ग्रामस्थ उपस्थित होते

No Comment! Be the first one.