चारधाम आणि १२ ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचा संकल्प; ठिकठिकाणी नागरिकांकडून स्वागत आणि सत्कार
लोकार्थ प्रतिनिधी पोर्वाल जवळाबाजार, हिंगोली
आजच्या धकाधकीच्या जीवनात आईच्या आरोग्यासाठी आणि तिच्या दीर्घायुष्यासाठी अनेकजण विविध प्रयत्न करतात. मात्र, बिहारमधील एका तरुणाने आपल्या आईचे आरोग्य उत्तम राहावे आणि तिला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी चक्क संपूर्ण भारतातील चारधाम आणि बारा ज्योतिर्लिंगांची पायी यात्रा करण्याचा अनोखा संकल्प केला आहे.
मोनू बोटरबाला ‘ब्लॅक पॅंथर’ असे या तरुणाचे नाव असून, तो सध्या आपल्या संकल्पपूर्तीसाठी भारतभर पायी प्रवास करत आहे. परळी वैजनाथ आणि परभणीमार्गे तो औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग, हिंगोलीच्या दिशेने जात असताना मार्गावरील विविध गावांमध्ये नागरिकांनी त्याचे उत्स्फूर्त स्वागत केले.
आईच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी एवढा मोठा पायी प्रवास करण्याचा मोनू यांचा संकल्प ऐकून स्थानिक युवा कार्यकर्ते आणि नागरिक भारावून गेले. मार्गात ठिकठिकाणी त्यांचा सत्कार करून त्यांच्या या अनोख्या संकल्पाचे कौतुक करण्यात आले.
आईप्रती असलेली श्रद्धा, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केलेली ही पायी यात्रा सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत असून, तरुणाच्या या अनोख्या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No Comment! Be the first one.