घुगी सांगवी येथील घटना; हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज, पोलिसांकडून तपास सुरू
लोकार्थ प्रतिनिधी शरद मेहकरे
शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील घुगी सांगवी येथे शेतीच्या वादातून दोन भावांमध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. हिरामण हजारे असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घुगी सांगवी येथील हिरामण हजारे (वय ५२) आणि त्यांचे भाऊ धनराज हजारे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शेतीच्या कारणावरून वाद सुरू होता. मंगळवारी सायंकाळी हा वाद पुन्हा उफाळून आला. त्यातून दोघांमध्ये हाणामारी झाल्याचे समोर आले आहे.
घटनेनंतर हिरामण हजारे यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार, त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम तपासातून स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, मृत हिरामण हजारे यांच्या पत्नी सत्यकला हजारे यांनी पतीचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचा आरोप केला असून, संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मायने आणि पोलीस अधिकारी अक्षय जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलीस उपनिरीक्षक उमेश रायबोळे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
शेतीच्या वादातून घडलेल्या या घटनेमुळे घुगी सांगवी परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या तपासानंतरच मृत्यूमागील नेमके कारण आणि घटनेची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
No Comment! Be the first one.