मच्छिंद्रनाथ चिंचोलीत ‘जलधारा’ प्रकल्पाचा शुभारंभ; ६०० घरांतील पाण्याचा पुनर्वापर करण्याचा संकल्प
लोकार्थ प्रतिनिधी अविनाश घोगरे
घनसावंगी- पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत मुरविण्यासाठी मच्छिंद्रनाथ चिंचोली ग्रामस्थांनी अभिनव पुढाकार घेतला आहे. घराघरातून निर्माण होणारे सांडपाणी तसेच छतावर पडणारे पावसाचे पाणी योग्य पद्धतीने प्रक्रिया करून भूजल पुनर्भरणासाठी वापरण्याच्या ‘जलधारा’ प्रकल्पाचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला. जलधारा टीमच्या वतीने जलधारा खड्ड्याचे भूमिपूजन करून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.
गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रेरणेतून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन व शुभाशीर्वाद योगीराज कैलास महाराज यांच्या हस्ते झाले. आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक अरविंद दादा घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जलधारा टीमच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
गावातील सांडपाणी ही समस्या न मानता त्याचा उपयोग भूजल पुनर्भरणासाठी करण्याचा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. घरातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर आवश्यक प्रक्रिया करून ते जलधारा खड्ड्यात सोडले जाणार आहे. या माध्यमातून पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर छतावर पडणारे पावसाचे पाणीही अडवून ते जमिनीत मुरविण्यावर भर दिला जाणार आहे.
जलधारा टीमच्या माहितीनुसार, एका घरातून दररोज सरासरी २०० लिटर सांडपाणी निर्माण होते. गावातील सुमारे ६०० घरांचा विचार करता दररोज तब्बल १ लाख २० हजार लिटर पाणी उपलब्ध होऊ शकते. महिन्याला हा आकडा सुमारे ३६ लाख लिटर इतका होतो. वर्षभर या पाण्यावर योग्य प्रक्रिया करून ते जमिनीत मुरविल्यास मोठ्या प्रमाणात भूजल पुनर्भरण होऊ शकते. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी हा प्रयोग महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शेताच्या रचनेनुसार जलधारा
गावासाठी तीन, तर शेतकऱ्यांसाठी पाच विशेष प्रकल्प राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक शेताची प्रत्यक्ष पाहणी करून जमिनीचा उतार, पाण्याचा नैसर्गिक प्रवाह आणि भौगोलिक रचना लक्षात घेऊन जलधारा प्रकल्पाची आखणी केली जाणार आहे. पावसाचे पाणी शेताबाहेर वाहून जाण्याऐवजी शेतातच मुरविण्यासह उपलब्ध पाण्याचे भूजल पुनर्भरण करण्यावर भर दिला जाणार आहे.
२०१८ पासून उपक्रम; दुष्काळात पुन्हा गरज अधोरेखित
‘जलधारा’ उपक्रमाची सुरुवात २०१८ पासून करण्यात आली आहे. मागील काही वर्षांत चांगला पाऊस तसेच अतिवृष्टी झाल्याने या प्रयोगाची व्यापक गरज तितकी प्रकर्षाने जाणवली नाही. मात्र, यंदा पावसातील मोठा खंड आणि निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे भविष्यात पावसाचा प्रत्येक थेंब तसेच घरातून निर्माण होणाऱ्या पाण्याचा योग्य वापर करून भूजल पातळी वाढविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
पाणीटंचाईवर केवळ टँकर किंवा तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता गावपातळीवर पाण्याचे नियोजन आणि भूजल पुनर्भरण करणे आवश्यक आहे. ‘पाणी जिरवा, भविष्य सुरक्षित करा’ या संकल्पनेतून जलधारा प्रकल्प राबविला जात असून, गावातील नागरिकांनी या जलसंवर्धन चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन जलधारा टीमच्या वतीने करण्यात आले आहे.
सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करून ते जलधारा खड्ड्यात मुरविणे, पावसाचे पाणी अडविणे आणि भूजल पातळी वाढविणे, या त्रिसूत्रीच्या माध्यमातून मच्छिंद्रनाथ चिंचोलीत जलसंवर्धनाचा नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
No Comment! Be the first one.