लोकार्थ प्रतिनिधी पंकज पवार
अंबड : अंबड तालुक्यातील वाळकेश्वर शिवारात विलास मोहनराव शिंदे (रा. नवीन नागझरी, ता. गेवराई, जि. बीड) या विवाहित तरुणाने बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मृताच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीत पैशांच्या व्यवहारावरून तगादा लावून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा उल्लेख असल्याचे समजते.
वाळकेश्वर शिवारातील माणिक जैस्वाल यांच्या गट क्रमांक ४४ मधील शेतात तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. शेतकऱ्यांनी तत्काळ शहागड पोलिसांना माहिती दिली. सहायक फौजदार फुलचंद हजारे व जमादार रामदास केंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.
मृताच्या खिशात स्वतः लिहिलेली चिठ्ठी आढळली. पैशांच्या व्यवहारातून काही व्यक्तींकडून पैशांची मागणी आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा उल्लेख त्यात असल्याची माहिती आहे. या आरोपांची सत्यता आणि व्यवहारासंबंधीची माहिती पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी शहागड प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला असून, पुढील तपास शहागड पोलीस करीत आहेत.

No Comment! Be the first one.