मध्यरात्री लागलेल्या आगीत २० ते २५ लाखांचे नुकसान; पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत आंबिलवादे
आडुळ येथे कन्यादान भांडे भांडाराला भीषण आग!
मध्यरात्री लागलेल्या आगीत २० ते २५ लाखांचे नुकसान; पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात
आडुळ (ता. पैठण) येथे रविवारी मध्यरात्री कन्यादान भांडे भांडार या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दुकानातील लग्नसमारंभासाठी लागणाऱ्या महागड्या भेटवस्तू आणि साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत जवळपास २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दुकानाचे मालक बंडू काळे यांनी दिली.
रविवारी दिवसभराचा व्यवहार आटोपून दुकान मालक बंडू काळे दुकान बंद करून घरी गेले होते. मात्र, मध्यरात्री अचानक दुकानाला आग लागल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच त्यांनी परिसरातील नागरिकांना सतर्क केले. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
अग्निशमन दलाच्या पथकाने आणि स्थानिक नागरिकांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला उपलब्ध पाण्याच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पाण्याचा साठा संपल्याने अन्य ठिकाणांहून पाण्याची व्यवस्था करावी लागली. अखेर सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
या आगीत लग्नसमारंभात भेट म्हणून दिल्या जाणाऱ्या महागड्या वस्तूंसह दुकानातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेमुळे व्यापाऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
No Comment! Be the first one.