२ हजार ८०२ किलो मसाल्यांचा साठा सील; उत्पादन युनिटचा परवाना निलंबित
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत गाढे जळगाव येथील मेसर्स ५ स्टार मसाले कंपनीवर छापा टाकला. या कारवाईत हळद, मिरची, धणे पावडर आणि मटण मसाला असा एकूण २ हजार ८०२ किलो साठा जप्त करण्यात आला. या मालाची किंमत १६ लाख ४० हजार ९०० रुपये असून, कंपनीचा अन्न उत्पादन परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. कुचेकर यांच्या पथकाने गट क्रमांक २९९/पी, गाढे जळगाव येथे ही कारवाई केली. यामध्ये ४८८ किलो हळद पावडर, ७९८ किलो मटण मसाला, ९१८ किलो मिरची पावडर आणि ५९८ किलो धणे पावडर जप्त करण्यात आली.
जप्त केलेला संपूर्ण साठा सील करून पुढील आदेशापर्यंत कंपनीच्या संचालकांच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला आहे. या साठ्यात कोणतीही छेडछाड करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा मानके कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न उत्पादकांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा FDA चे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला.
No Comment! Be the first one.