बारामती ॲग्रो परिसरातील बेशिस्त वाहतूकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर.
लोकार्थ प्रतिनिधी कार्तिक राजगुरू
कन्नड – शहरातील बायपास आणि बारामती ॲग्रो कन्नड साखर कारखाना परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून शुक्रवारी (दि. ३०) रात्रीच्या सुमारास झालेल्या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघाताने संपूर्ण शैक्षणिक वर्तुळात आणि कन्नड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
भानुदास एकनाथ नागरे (वय ५३, रा. निंभोरा, ता. कन्नड)असे मृत शिक्षकाचे नाव असून, ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातखेडा, केंद्र वासडी, ता.कन्नड येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, आई-वडील असा परिवार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक भानुदास नागरे हे त्यांच्या मुलीचे सासरे (व्याही) यांच्या अंत्यविधीसाठी दुचाकी क्रमांक एमएच २०-जीएच-५८३२ ने सासेगाव येथे जात होते. दरम्यान सायंकाळच्या सुमारास बारामती ॲग्रो साखर कारखान्यासमोर ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीचा धक्का त्यांच्या मोटारसायकलला लागला.धक्का लागल्याने त्यांचा तोल गेला आणि त्याचवेळी मागून येणाऱ्या ऊसाने भरलेल्या ट्रक क्रमांक एमएच २०-डीआय-९३८२ च्या चाकाखाली ते आले. ट्रकच्या पुढील व मागील चाकाखाली गंभीररित्या चिरडले गेल्याने ते गंभीर जखमी झाले.
नातेवाईक आणि नागरिकांनी तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. रुक्सार खान यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या अपघातामागे केवळ ट्रक नाही, तर प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापनाचा निष्काळजीपणाही कारणीभूत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
जीवघेणा अरुंद रस्ता कन्नड बायपास ते कारखान्यापर्यंतचा हा रस्ता आधीच खूप छोटा आणि अरुंद आहे. वर्दळीच्या तुलनेत तो अपुरा पडतो.कारखाना सुरू झाल्यापासून या रस्त्यावर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, अवजड ट्रक, बैलगाड्या यांची प्रचंड गर्दी असते. कोणतेही नियोजन नसल्याने सर्वसामान्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, कारखान्याच्या सीएसआर फंडातून रस्त्याच्या बाजूलाच एक मोठी चारी खोदण्यात आली आहे. ही चारी मागील जवळपास एक वर्षापासून खोदलेली आहे. पण माती कारखान्याच्या बाजूला टाकण्याऐवजी ती थेट रस्त्याच्या कडेला टाकण्यात आली आहे. त्यामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता आणखी निम्मा झाला आहे.
या सर्व कारणांमुळे हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत जीवघेणा बनला आहे. यापूर्वीही या परिसरात अनेक अपघात झाले आहेत, मात्र ठोस सुधारणा होताना दिसत नाही.
आता या दुर्दैवी घटनेनंतर तरी प्रशासनाला जाग येणार का.ऊस वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था होणार का.रस्त्याच्या कडेला पडलेली माती तात्काळ हटवून रस्ता मोकळा करणार का असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
कन्नड पोलिस पुढील तपास करत आहेत.

No Comment! Be the first one.