घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री ११ वाजता अखेरचा श्वास; सहाही आरोपी अटकेत, आजपर्यंत पोलीस कोठडी
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड
गंगापूर : सकाळी शिवीगाळ का केली, या कारणावरून सहा जणांनी मिळून चाकूने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दत्तू संतोष भक्कड (वय २३) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेने गंगापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणातील सहाही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार, २८ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ८.४५ वाजता गंगापूर शहरातील राजीव गांधी चौकाजवळील बंडू यांच्या चहाच्या हॉटेलच्या ओट्याजवळ ही घटना घडली. आरोपी आतिष गायकवाड याने दत्तूला, ‘सकाळी तू मला आणि राहुल फुलारे याला शिवीगाळ का केली होती?’ असा जाब विचारला. त्यानंतर सहा जणांनी एकत्र येत दत्तूला शिवीगाळ करून चापट-बुक्क्यांनी मारहाण केली.
याचवेळी राहुल फुलारे याने हातातील चाकूने दत्तूच्या पोटावर, पाठीवर, कानाजवळ आणि डोक्याजवळ सपासप वार केले. या हल्ल्यात दत्तू गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली.
या प्रकरणी दत्तूची आई छाया संतोष भक्कड (वय ४०, रा. सखारामपंतनगर, गंगापूर) यांच्या फिर्यादीवरून राहुल फुलारे, आतिष गायकवाड, पवन गायकवाड, करण शिंदे, चेतन गायकवाड आणि विशाल कापसे या सहा जणांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४९१/२०२६ दाखल करण्यात आला होता. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९(१) यासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सहाही आरोपी अटकेत; आजपर्यंत पोलीस कोठडी
या प्रकरणातील राहुल फुलारे, आतिष गायकवाड, पवन गायकवाड, करण शिंदे, चेतन गायकवाड आणि विशाल कापसे या सहाही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, जखमी दत्तू भक्कडचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक पाटील करीत आहेत.
दत्तू भक्कडच्या अकाली मृत्यूने भक्कड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गंगापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी (३१ ऑक्टोबर) दुपारी २ वाजेनंतर गंगापूर येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
No Comment! Be the first one.