मराठवाड्यातील उद्योजकांकडून ६ कोटी १८ लाखांचा मदतनिधी; एक हजार पाण्याच्या टाक्या, ५०० शिलाई मशीनचे वाटप; ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ महानाट्याला हजारोंची उपस्थित
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर, दि. १ : मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट असून, शेतकरी आणि शेतमजुरांना धीर देण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून शेतकऱ्यांना संघर्षाची आणि नव्या उभारीची प्रेरणा मिळेल. शासन बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवेंद्र सेवा महोत्सव समितीच्या वतीने जाबिंदा मैदानावर आयोजित ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ महानाट्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मराठवाड्यातील उद्योजकांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ६ कोटी १८ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत १८ पगड जातींना एकत्र आणून रयतेचे राज्य स्थापन केले. महाराजांनी धर्म, संस्कृती आणि स्वराज्यासाठी संघर्ष केला. त्यांचे मावळे पगारासाठी नव्हे, तर स्वराज्यासाठी लढत होते. आजही सर्वांनी भेद विसरून एकत्र आले पाहिजे. आपण विभाजित राहिलो तर गुलामगिरीकडे जाऊ, एकत्र राहिलो तर सामर्थ्य निर्माण करू. संतांच्या आशीर्वादाने भगव्याची प्रतिष्ठा राखण्याचे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले. नगरसेवक ते मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास जनतेशी नाते जोडणारा आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाला त्यांनी चालना दिली असून, अनेक आव्हानांमध्ये कार्यतत्परता राखणे हा त्यांचा स्वभाव आहे. महाराष्ट्राच्या जनतेने दिलेली मोठी जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाला जनकल्याणाचे बळ लाभो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार अनुराधा चव्हाण, नारायण कुचे यांच्यासह संत-महंत उपस्थित होते. देवेंद्र सेवा महोत्सव समितीच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक हजार पाण्याच्या टाक्या आणि महिलांसाठी ५०० शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. महेंद्र राजेमहाडिक लिखित व दिग्दर्शित महानाट्याला हजारोंचा प्रतिसाद मिळाला.
No Comment! Be the first one.