शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची प्रगती आणि सर्वांगीण विकासावर पालक मेळाव्यात भर
लोकार्थ प्रतिनिधी वागलगावे माधव चाकूर
जळकोट : येथील विजयवर्धिनी माध्यमिक आश्रमशाळेत मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी प्रथम सत्र अखेर पालक मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एम. आर. वागलगावे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सहशिक्षक पी. डी. पाटील उपस्थित होते. प्रारंभी सहशिक्षक पंचडे आर. एस. यांनी उपस्थित पालकांचे स्वागत केले.
या मेळाव्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे व तिचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये शैक्षणिक साहित्य प्रदर्शन, प्रयोगशाळेतील साहित्याचे प्रदर्शन, शासनाकडून विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या विविध सुविधांची माहिती तसेच दिवाळी सुट्टीतील अभ्यासक्रमाचे पालकांसमक्ष वाटप करण्यात आले. यासोबतच विद्यार्थी शिस्त व सुरक्षा याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्रातील शैक्षणिक प्रगतीचा आढावा पालकांसमोर मांडण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा आणि पालक यांच्यात समन्वय व नियमित संवाद असणे गरजेचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक पेद्दावाड एम. एम. यांनी केले, तर सहशिक्षक कांबळे एस. जी. यांनी आभार मानले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विविध शैक्षणिक उपक्रमांच्या सहभागातून हा पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला.



No Comment! Be the first one.