पळशी (बु.) गावावर शोककळा; देशसेवेचे स्वप्न अधुरेच, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
लोकार्थ प्रतिनिधी किशोर जाधव
भारतीय सैन्यदलात देशसेवेचे पवित्र कर्तव्य बजावणारे पळशी (बु.) येथील जवान अमोल सुदाम जाधव (वय ३६) यांचे मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता गावात धडकताच पळशी (बु.), पिशोरसह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, जवान अमोल जाधव हे अवघ्या दहा दिवसांपूर्वीच सुट्टीवर आपल्या गावी आले होते. कुटुंबीयांसोबत काही दिवस घालवून ते पुन्हा देशसेवेच्या कर्तव्यावर रुजू झाले होते. त्यांच्या सैन्यदलातील सेवेला अवघे एक वर्ष शिल्लक होते. त्यानंतर ते सेवानिवृत्त होऊन कुटुंबासमवेत आयुष्य व्यतीत करणार होते. मात्र, सेवानिवृत्तीचे स्वप्न उराशी बाळगून असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने जाधव कुटुंबीयांच्या आनंदी भविष्याची स्वप्ने क्षणात उद्ध्वस्त झाली आहेत.
अवघ्या ३६व्या वर्षी देशसेवेतील या जवानाची जीवनयात्रा संपल्याने गावकऱ्यांसह नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, बहीण, भाऊ, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार आणि देशसेवेचा अभिमान असलेले अमोल जाधव यांच्या निधनाने पळशी गावाने एक कर्तव्यनिष्ठ जवान गमावला आहे. जवान अमोल सुदाम जाधव यांच्यावर गुरुवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या मूळ गावी पळशी (बु.), पिशोर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
No Comment! Be the first one.