मंत्री अतुल सावे यांच्या परिवाराकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटींचे योगदान
लोकार्थ प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील, विशेषतः मराठवाड्यातील शेतकरी बांधव आणि ग्रामीण भागातील नागरिक सध्या पाणीटंचाई व शेतीच्या नुकसानीमुळे कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. बळीराजावर आलेल्या या संकटाची जाणीव ठेवत मंत्री अतुल सावे यांच्या परिवाराने सामाजिक बांधिलकीचे अनोखे उदाहरण समोर ठेवले आहे.
मंत्री अतुल सावे यांच्या मुलगा अनुराग आणि ईशा यांचा विवाह सोहळा येत्या २५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या विवाहानिमित्त मोठ्या स्वरूपात भव्य विवाहसमारंभ आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, राज्यातील शेतकरी बांधव आणि सर्वसामान्य नागरिक संकटात असताना मोठ्या प्रमाणावर आनंदोत्सव साजरा करणे उचित वाटत नसल्याची भावना व्यक्त करत सावे परिवाराने नियोजित भव्य विवाहसमारंभ रद्द करून हा विवाह निवासस्थानी साध्या व कौटुंबिक स्वरूपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मंत्री अतुल सावे यांच्या परिवाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटी रुपये (₹1,00,00,000/-) इतके योगदान देण्याचा निर्णय घेतला. या रकमेचा धनादेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
या माध्यमातून संकटग्रस्त शेतकरी बांधवांना आणि गरजू कुटुंबांना काही प्रमाणात दिलासा मिळावा, हीच या योगदानामागील भावना असल्याचे सावे परिवाराच्या वतीने सांगण्यात आले.
समाजातील दुःखाच्या प्रसंगी आपल्या आनंदातही समाजाचा विचार करून मदतीचा हात पुढे करणारा हा निर्णय सामाजिक संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेचे उत्तम उदाहरण ठरत आहे.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अजित मुळे, अजिंक्य सावे आणि अनुराग सावे उपस्थित होते.

No Comment! Be the first one.