मागील वर्षीची गर्दी यंदा गायब; आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्यांनी फटाके खरेदीकडे फिरवली पाठ
लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे
जालना – राज्य सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली असली, तरी यंदाच्या फटाके बाजारपेठेत अपेक्षित उत्साह दिसून येत नसल्याचे चित्र आहे. मागील वर्षी दिवाळीच्या काळात फटाके खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारपेठेत मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. मात्र यंदा फटाके मार्केटमध्ये शुकशुकाट असल्याचे दिसून येत आहे.
शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसणे, शेतीचे वाढते खर्च, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि आर्थिक अडचणी यामुळे शेतकरी सध्या खर्च करताना हात आखडता घेत असल्याचे चित्र आहे. राज्य सरकारकडून मिळालेली पाच हजार रुपयांची मदत ही शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तुलनेत अपुरी असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरवर्षी दिवाळीच्या सणाला फटाके बाजारात शेतकरी कुटुंबांची मोठी गर्दी असते. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण फटाके खरेदीसाठी बाजारात येतात. मात्र यंदा ही गर्दी मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा परिणाम आता थेट दिवाळीच्या बाजारपेठेवरही होत असल्याचे दिसून येत असून, फटाके विक्रेत्यांनाही याचा आर्थिक फटका बसत आहे.
No Comment! Be the first one.